‘रिलायन्स’ आणणार भारतात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक

खनिज तेल उत्पादनातील मातब्बर कंपनी असलेली सौदी अरामको रिलायन्समध्ये गुंतवणूक करणार असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली आहे.

Mumbai
mukesh_ambani
उद्योगपती मुकेश अंबानी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमटेडची (RIL) आज, सोमवारी मुंबईत ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा होत असून या सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. खनिज तेल उत्पादनातील मातब्बर कंपनी असलेली सौदी अरामको रिलायन्समध्ये गुंतवणूक करणार असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली आहे. सौदी अरामको आरआयएलच्या ओटूसी अर्थात ऑइल टू केमिकल उद्योगातील २० टक्के भागभांडवल खरेदी करणार असून, त्याचे एकूण मूल्य ७५ अब्ज डॉलर (अंदाजे ५, ३२, ४६६ कोटी) इतके आहे.

रिलायन्सला उद्योगातून ५.७ लाख कोटी रुपयांचे मिळाले उत्पन्न

सौदी अरामकोशी केलेला करार ही देशातील आतापर्यंतची सर्वाधिक विदेशी गुंतवणूक असल्याचे अंबांनी यांनी सांगितले आहे. आरआयएल आणि अरामकोमधील करारानुसार, रिलायन्सच्या ओटूसी उद्योगातील २० टक्के भागभांडवल अरामको खरेदी करणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली आहे. २०१९ या आर्थिक वर्षात रिलायन्सला या उद्योगातून ५.७ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, असेही अंबानींनी सांगितले आहे. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदी ही तात्पुरती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा करणार

अरामको जगातील सर्वात मोठ्या रिलायन्सच्या जामनगर येथील रिफायनरीला दररोज पाच लाख बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा करणार आहे. सौदी अरामको ही सौदी अरबमधील नॅशनल पेट्रोलियम अँड गॅस कंपनी असून उत्पन्नाच्या बाबतीत ती जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. रिलायन्सच्या जामनगर येथील रिफायनरीची क्षमता प्रतिदिन १.४ दशलक्ष बॅरल इतकी आहे. ती २०३० पर्यंत वाढवून २ दशलक्ष बॅरल करण्याचे नियोजित आहे. आरआयएलने यासंदर्भात भारत सरकारशी चर्चा केली आहे.


हेही वाचा – रिलायन्स करणार जिओ फायबर लाँच; ७०० रुपयांत इंटनेट प्लॅन