अर्णब गोस्वामींना लावलेला न्याय ‘या’ पत्रकाराला का नाही? मथुरेच्या तुरुंगात खितपत!

reporter siddique kappan (photo - Jansatta)
या कुटुंबाला अर्णब गोस्वामींप्रमाणेच न्याय लावला जाणार का?

देशभर गाजलेल्या रिबप्लिक टीव्हीचे पत्रकार Arnab Goswami यांच्या अटकेच्या प्रकरणावर अजूनही पडदा पडलेला नसताना आता त्यांच्यासारखेच देशभरातल्या अनेक तुरुंगांमध्ये असलेल्या पत्रकारांनी न्यायासाठी साद घालायला सुरुवात केली आहे. अर्णब गोस्वामी यांना जो न्याय लावण्यात आला, तोच न्याय आम्हाला का नाही? आम्ही भारताचे नागरिक नाही का? असा सवाल आता या पत्रकारांचे कुटुंबीय विचारू लागले आहेत. अर्णब गोस्वामी यांच्या जामिनासाठी आदल्या दिवशी संध्याकाळी उशिरा दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात तातडीने दुसऱ्या दिवशी सुनावणी घेऊन त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, भारतात विविध ठिकाणी अजूनही अनेक पत्रकार विविध आरोपांखाली तुरुंगात असून त्यांच्या याचिका मात्र सुनावणीसाठी अद्याप आलेल्या नाहीत.

असेच एक पत्रकार आहेत सिद्दिकी कप्पन. सिद्दिकी मल्याळम न्यूज वेबसाईट अनिमुखम (Azhimukham) साठी पत्रकारिता करतात. ५ ऑक्टोबर २०२०ला त्यांना उत्तर प्रदेशच्या मथुरामधून अटक करण्यात आली होती. हथरस सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचं कव्हरेज करण्यासाठी ते हथरसला जात असताना त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, गेल्या ४० हून जास्त दिवसांपासून त्यांना मथुराच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांची याचिका अद्याप सुनावणीसाठी घेण्यात आली नसून त्यांचे कुटुंबीय न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळेच अर्णब गोस्वामी यांना लावण्यात आलेला न्याय आम्हाला का नाही? असा सवाल हे कुटुंबीय विचारू लागले आहेत. जनसत्ताने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

कप्पन यांची पत्नी रेहाना म्हणतात, ‘अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळाल्याचं ऐकल्यापासून मला वाटू लागलंय की माझ्या पतीला न्याय मिळाला नाही. पतीला अटक झाल्यापासून मला त्यांना भेटूही दिलं गेलेलं नाही. आम्हाला त्यांच्याविषयी काहीही माहिती नाही. त्यांचा एक शब्द देखील ऐकायला मिळालेला नाही. हे फार भयंकर आहे. आम्ही न्यायपालिकेकडे गेलो, सरकारकडे गेलो, प्रशासनाकडे गेलो. पण आम्हाला न्याय मिळाला नाही. आम्ही या देशाचे नागरिक नाहीत का? या देशात न्याय सगळ्यांसाठी नाही, फक्त काही लोकांसाठी आहे. अर्णब गोस्वामी यांच्या प्रकरणात सगळ्या गोष्टी वेगाने कशा झाल्या?’

रेहाना सांगतात, ‘कप्पन यांच्या ९० वर्षांच्या आईला अल्झायमरमुळे विसरायची सवय आहे. त्यांना आम्ही कप्पन यांच्या अटकेविषयी काहीही सांगितलेलं नाही. त्यांनी विचारल्यावर कप्पन दिल्लीला गेले असून लवकरच परत येणार असल्याचं आम्ही सांगतो’.

४१ वर्षीय सिद्दिकी कप्पन यांच्यावर हथरस प्रकरणावरून धार्मिक वितुष्ट पसरवण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यासाठी कट कारस्थान रचण्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. त्यात UAPA आणि राजद्रोह या आरोपांचा देखील समावेश आहे.