घरताज्या घडामोडीभाजपला झटका; शिरोमणी अकाली दल NDA मधून बाहेर!

भाजपला झटका; शिरोमणी अकाली दल NDA मधून बाहेर!

Subscribe

केंद्र सरकारने नुकत्याच पारित केलेल्या कृषी विषयक विधेयकाचा आणि केंद्र सरकारच्या शेतीविषयक धोरणांचा निषेध करत अखेर सुखबीरसिंग बादल यांच्या शिरोमणी अकाली दलाने केंद्रातील NDA सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. काही दिवसांपूर्वीच सुखबीरसिंग बादल यांच्या पत्नी आणि केंद्र सरकारमधील माजी मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत मंत्रीमंडळातून बाहेर पडण्याचं मोठं पाऊल उचललं होतं. मात्र, तोपर्यंत ‘आम्ही सरकारमध्ये कायम आहोत, मात्र कृषीविषयक धोरणाचा निषेध आहे’, असं धोरण सुखबीर सिंग बादल यांनी जाहीर केलं होतं. मात्र, दोनच दिवसांपूर्वी, ‘आत्तापर्यंत आम्ही हात जोडत होतो, आता दिल्लीच्या भिंदी हलवून सोडू’, असं म्हणत हरसिमरत कौर बादल यांनी पुढच्या वाटचालीचे संकेत दिले होते. अखेर आज रात्री उशिरा शिरोमणी अकाली दलाने NDA मधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.

- Advertisement -

केंद्र सरकारने शेती क्षेत्राशी संबंधित ३ विधेयकं संसदेत मांडून मंजूर करून घेतली. या विधेयकांना शिरोमणी अकाली दलाचा सुरुवातीपासून विरोध होता. ही विधेयकं शेतकऱ्यांच्या हिताची नाहीत, अशी पक्षाची भूमिका होती. मात्र, भाजपकडून तरीदेखील विधेयकं रेटून न्यायचं धोरण राबवलं गेलं. यामुळे शिरोमणी अकाली दलानं (SAD) हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. ‘शेतकऱ्यांचा माल बाजारात योग्य भावात विकला जाईल याची कोणतीही खात्री केंद्र सरकराकडून दिली जात नसून आपल्या भूमिकेवर भाजपप्रणीत सरकार ठाम आहे. त्यामुळे शिरोमणी अकाली दलाने केंद्र सरकार आणि भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार हरसिमरत कौर यांनी देखील भाजप सरकारवर टीका केली आहे. ‘अटल बिहारी वाजपेयी आणि अकाली दलचे नेते प्रकाश सिंग बादल यांनी उभी केलेली एनडीए आता राहिलेली नाही. ३ कोटी पंजाबी जनतेच्या आंदोलनाचा देखील मोदी सरकारवर काही परिणाम झाला नाही. आणि जर त्याचा परिणाम होत नसेल, तर अटलजी आणि बादल साहेबांनी उभी केलेली एनडीए ही नाही. सर्वात जुन्या मित्र पक्षाच्या भूमिकेकडे जर दुर्लक्ष केलं जात असेल, तर शेतकऱ्यांसाठी आणि पंजाबसाठी हे सरकार हितावह नाही’, अशी भूमिका हरसिमरत कौर यांनी मांडली आहे.


वाचा सविस्तर – मोदी सरकारच्या शेतीविषयक धोरणांच्या विरोधात केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा!
Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -