सायना नेहवालला स्पर्धेसाठीही व्हिसा मिळेना; ट्वीटरवर मांडली कैफियत!

बॅडमिंटनपटू सायना नेहवालला डेन्मार्क ओपनमध्ये खेळायला जाण्यासाठी व्हिसा अद्याप मंजूर झालेला नसून त्यासाठी आता सायना नेहवालने थेट ट्वीटवरच परराष्ट्र मंत्रालयाला विनंती केली आहे.

New Delhi
सायनाची परराष्ट्र मंत्रालयाला विनंती

भारताची फुलराणी अर्थात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने केंद्रीय परराष्ट्र खात्याला डेन्मार्कला जाण्यासाठी व्हीसा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी विनंती केली आहे. खरंतर सायना नेहवाल डेन्मार्कला तिच्या वैयक्तिक कामासाठी जात नसून तिथे होणाऱ्या टूर्नामेंटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जाणार आहे. मात्र, तरीदेखील तिचा व्हिसा अद्याप तयार करण्यात आलेला नाही. वास्तविक ही प्रक्रिया क्रीडा विभागाकडून परस्पर पूर्ण व्हायला हवी. मात्र, ती देखील पूर्ण होऊ शकली नाही, म्हणून अखेर सायना नेहवालने थेट ट्वीटरवर परराष्ट्र मंत्रालय आणि परराष्ट्रमंत्र्यांना टॅग करून व्हिसा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, एका राष्ट्रीय खेळाडूला आंतरराष्ट्रीय टूर्नामेंटमध्ये खेळण्यासाठीची व्हिसा प्रक्रिया पूर्ण होत नसल्यामुळे यावर नेटिझन्सनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाली सायना?

सायनाने या ट्वीटमध्ये परराष्ट्र मंत्रालयाला तातडीची विनंती केली आहे. सायना म्हणते, ‘माझे प्रशिक्षक आणि मला डेन्मार्कला जाण्यासाठी व्हिसा मिळावा अशी मी तातडीची विनंती करते. पुढच्या आठवड्यात माझी टूर्नामेंट आहे. सामने पुढच्या मंगळवारपासून सुरू होणार आहे. पण आम्हाला अजूनही व्हिसा मिळालेला नाही.’ असं म्हणत सायनाने परराष्ट्रमंत्री जयशंकर, परराष्ट्र खातं यांना ट्वीटमध्ये टॅग केलं आहे. दरम्यान, यावर परराष्ट्र खात्यातील उच्चपदस्थ अधिकारी संजीव गुप्ता यांनी लागलीच प्रतिक्रिया दिली आहे.

सायनाच्या या ट्वीटनंतर नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. काहींनी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या तत्परतेचा दाखला दिला आहे.

तर काही नेटिझन्सनी थेट विजय माल्ल्या आणि नीरव मोदी यांनाच मध्ये आणलं आहे!