ओबामांना भारताबद्दल काय माहिती आहे? राहुल गांधीच्या समर्थनार्थ संजय राऊत मैदानात

Sanjay Raut and Rahul Gandhi
शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी लिहिलेल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल भाष्य करण्यात आले आहे. यानंतर भाजपने राहुल गांधी यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. राहुल गांधी यांची सोशल मीडिया आणि माध्यमातून भाजप खिल्ली उडवत असताना शिवसेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत हे राहुल गांधीच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. ओबामा यांना भारताबद्दल काय माहीत आहे? अशी टीका राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “परदेशातील राजकारण्यांनी भारतीय नेत्यांबाबत असे भाष्य करण्याची गरज नाही. ट्रम्प हे वेडे आहेत, असे आम्ही कधी म्हटले का? बराक ओबामा यांना भारताबाबत कितपत माहिती आहे?” असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकात काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याबाबत भाष्य केलेले आहे. राहुल गांधी यांच्या राजकीय योग्यतेबाबत बोलताना त्यांनी गांधी यांना कमी योग्यतेचे म्हटले आहे. तसेच ते नर्व्हस व्यक्ती असल्याचे देखील म्हटले आहे. राहुल गांधी असे विद्यार्थी आहेत, जे शिक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरले आहेत, अशीही टीप्पणी करण्यात आली आहे. तर डॉ. मनमोहन सिंह यांच्याबाबात शांत, निष्ठा असलेला व्यक्ती असे नमूद केले आहे. एकप्रकारे मनमोहन सिंह यांची स्तुती तर राहुल गांधी यांच्याबाबत कमी महत्त्व असलेले लिखाण करण्यात आलेले आहे.