चंद्राबाबूंच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा!

'शिवसेनेच्या प्रेरणेमुळेच चंद्राबाबू नायडू रालोआतून बाहेर पडले', असा दावा खासदार राऊत यांनी केला होता.

Mumbai
collage Sanjay Raut met chandrababu naidu as shivsena supports naidu's hunger strike

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या दिल्लीतील उपोषणाला पाठिंबा देत, शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे. यामुळे चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसमशी शिवसेनेची असलेली जवळीक अधिक घट्ट झाली आहे. ‘भाजप युतीधर्माचे पालन करीत नाही’, या शिवसेनेच्या वक्तव्याला सहमती दर्शवत चंद्राबाबू रालोआतून बाहेर पडले. यावेळीही शिवसेनेने त्यांची जोरदार पाठराखण केली होती. त्यानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत चंद्राबाबू यांच्या दिल्लीतील उपोषणस्थळी गेले आणि त्यांचा पाठिंबा दर्शवला. दरम्यान, यामुळे शिवसेना दबावतंत्राचा वापर करत आहे काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगायला सुरुवात झाली आहे. चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी, सोमवारी नवी दिल्लीत एक दिवसाचे उपवास आंदोलन केले होते.

दरम्यान, नायडूंच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्याासाठी बहुतांशी भाजपविरोधी नेत्यांनी उपोषणस्थळी भेट दिली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आदी नेत्यांनी उपषोणस्थळी जात उपवास आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. दरम्यान, उपोषणादरम्यान चंद्राबाबूंनी ”भाजपने शब्द न पाळल्याने आंध्र प्रदेशच्या अस्मितेस डिवचले आहे”, असा आरोप केला. मागील वर्षी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका करत स्वबळाचा नारा दिला होता. गेल्याचवर्षी रालोआमधून बाहेर पडून चंद्राबाबूंनी भाजपला जोरदार धक्का दिला. त्यामुळे ‘शिवसेनेच्या प्रेरणेमुळेच चंद्राबाबू रालोआतून बाहेर पडले’, असा दावा खासदार राऊत यांनी त्यावेळी केला होता. अशातच काल नायडूंच्या उपोषण मंडपात राऊत यांनी हजेरी लावल्यामुळे सेना दबाव तंत्राचा वापर करत असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षभरात नायडूंचा पक्ष तेलगू देसम आणि शिवसेना यांच्यातील जवळीक अधिकच वाढली असल्याची टीकाही केली जात आहे.

मोदीं विरोधातील एकी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि  तेलुगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी दिल्लीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या बारा तास सुरु असलेल्या उपोषणाला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे पुन्हा एकदा मोदींविरोधी एकी दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन,फारुक अब्दुल्ला, मुलायम सिंह यादव, माजी पंतप्रधान  मनमोहन सिंग, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आदी नेत्यांनी नायडू यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली.

मोदींविरोधी एकीचे प्रदर्शन (सौजन्य – ANI)