ल्होत्से शिखर सर करणारी सर्वात लहान भारतीय महिला ठरली प्रियांका मोहिते

priyanka mohite
ल्होत्से शिखर सर करणारी साताऱ्याची प्रियांका मोहिते

जगातील उंचच्या उंच शिखर सर करणे ही कोणत्याही व्यक्तीसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाचीच बाब. त्यातही ती महिला असेल तर तिच्याकडे अजून आदराने पाहिलं जातं. अतिशय कमी वयात हा मान मिळवला आहे साताऱ्याच्या प्रियांका मोहितेनं.

गिर्यारोहक प्रियांका मोहितेचा विक्रम

साताऱ्यात राहणाऱ्या अवघ्या २६ वर्षांच्या प्रियांका मोहिते या महाराष्ट्राच्या कन्येने नुकतेच जगातील चौथ्या क्रमांकावर उंच असणारे ल्होत्से नावाचे शिखर सर करत एक नवा विक्रम घडवला आहे. प्रियांका ही ल्होत्से शिखर सर करणारी पहिली तसेच सर्वात लहान भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे. प्रियांकाने याआधी वयाच्या एकविसाव्या वर्षी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करण्याचा मान मिळवला होता.
अनेक हिमालयीन मोहिमा प्रियांकाने आतापर्यंत सहज पूर्ण केल्या आहेत. तिने गिर्यारोहणातील शिक्षण नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिरिंग येथून घेतले आहे. बंदरपूच या शिखरापासून सुरुवात करत तिचा गिर्यारोहणातील सुरु झालेला प्रवास फ्रे पीक, एवरेस्ट अशी अनेक शिखरे पार करत सुरुच आहे. यात आता ल्होत्सेची भर पडली आहे. ल्होत्से सर करण्याचा हा तिचा दुसरा प्रयत्न होता. २०१५ मध्ये केलेल्या आधीच्या प्रयत्नात नेपाळमध्ये भूकंप आल्यामुळे तिला यश मिळाले नव्हते.

नोकरी सांभाळून प्रियांका करते सराव

या कामगिरीबद्दल प्रियांकाने सांगितलं की, ‘आपल्या देशात गिर्यारोहण हे नेहमीच पुरुषप्रधान क्षेत्र समजलं गेलं आहे. मला हा समज मान्य नाही त्यामुळेच महिला कुठेही मागे नाहीत हे दाखवण्याचा नेहमीच माझा प्रयत्न असतो.’ प्रियांका सध्या बंगळुरूमध्ये एका बायोटेक कंपनीमध्ये काम करत असून नोकरी करून उरलेल्या वेळात ती चढाईचा सराव करते. जगातील सर्वच शिखरं सर करण्याचा प्रियांकाच मानस आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात ती मनसलू किंवा मकालू यापैकी एक शिखर सर करणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here