NEET-JEE परीक्षा होणारच; सहा राज्यांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

neet jee exam

NEET-JEE परीक्षा पुढे ढकलण्यासाठी ६ राज्यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याआधीच नीट आणि जेईई (मेन) परीक्षांचं आयोजन करण्यासाठी मान्यता दिली होती. न्यायालयाच्या आदेशावर १७ ऑगस्ट रोजीच्या सहा राज्यांच्या मंत्र्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळत नीट आणि जेईई (मेन)च्या परीक्षांना हिरवा कंदील दिला आहे.

न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती बी.आर.गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. दाखल केलेल्या याचिकेत परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं होतं. मात्र, तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे. पश्चिम बंगालचे मंत्री मलय घटक, झारखंडचे मंत्री रामेश्वर ओरांव, राजस्थानचे मंत्री रघु शर्मा, छत्तीसगढचे मंत्री अमरजीत भगत, पंजाबचे मंत्री केबीएस सिद्धू आणि महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी ही याचिका दाखल केली होती. एनटीएकडून दोन्ही परीक्षांचं आयोजन करण्यात येतं. जेईई मुख्य परीक्षा ही १ ते ६ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. तर नीट परीक्षांचं आयोजन १३ सप्टेंबर रोजी करण्यात आलं आहे.