मोठी बातमी! मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नोकरी, शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही.

supreme court

सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालया मोठा निर्णय दिला आहे. सध्या नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही, असा निर्णय देत न्यायालयाने आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. शिवाय, या खटल्याची सुनावणी मोठ्या खंठपीठासमोर करण्याचा निर्णयही दिला आहे.

मराठा आरक्षणाचा विषय मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी मराठा आरक्षणाच्या समर्थकांची होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली असून मोठ्या खंडपीठाकडे या प्रकरणाची सुनावणी होईल. या खंडपीठामध्ये कोणते न्यायाधीश असतील याबाबत सरन्यायाधीश बोबडे ठरवतील. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांच्या तीन सदस्यीय खंठपीठासमोर मराठा आरक्षणा संदर्भात याचिकेवर सुनावणी झाली. मराठा आरक्षण नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी सध्या लागू करता येणार नाही. मात्र, याआधी देण्यात आलेल्या पदव्युत्तर प्रवेशांमध्ये बदल करु नये, असा महत्त्वाचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

महाभकास आघाडीला आरक्षण नकोच होतं – चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीका केली.मराठा समाजासाठी आजचा काळा दिवस असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. खंडपीठाचा निकाल लागेपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय लागू असेल. खंडपीठाचा निर्णय कधी लागेल हे सांगता येणार नाही. खंडपीठीकडे हे प्रकरण पाठवा, असा साधा अर्ज देखील राज्य शासनाने न्यायालयात केला नाही. कोरोनामुळे आम्ही कोणतीही भरती करत नाही असं सांगून राज्य सरकारने स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला असं चंद्रकांत पाटील म्हणाले. अनेक राज्यांचं आरक्षणाचा विषय न्यायालयात आहेत. मात्र महाराष्ट्राच्या आरक्षणाला स्थगिती का? महाभकास आघाडीला आरक्षण नकोच होतं. कोणत्याच नेत्याने लक्ष दिलं नाही, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.