घरदेश-विदेशअभ्यासू वृत्ती, प्रभावी वक्तुत्व ते उत्कृष्ट संसदपटू

अभ्यासू वृत्ती, प्रभावी वक्तुत्व ते उत्कृष्ट संसदपटू

Subscribe

अभ्यासू वृत्ती, उत्तम वक्ता आणि उत्कृष्ट संसदपटू असलेले अरुण जेटली पेशाने वकील होते. आपल्या वकिली शिक्षणाचा त्यांनी राजकारणात चतूरस्त्रपणे उपयोग केला. राज्यसभेत विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यांच्या या गुणांची आविष्कार पाहायला मिळाला. संसदेत विषयाला प्रखर युक्तिवादाची जोड देत ते समोरच्याला ते निशब्द करून टाकत तेव्हा त्यांचा चेहरा विलक्षण आत्मविश्वासाने भारलेला अनेक खासदारांनी पाहिला आहे. अर्थमंत्री पदाची धुरा सांभाळताना त्यांनी घेतलेले निर्णय देशाच्या इतिहासात मानाचे पान मिळवणारे आहेत...

रुबाबदार व्यक्तिमत

अरुण जेटली हे एक रुबाबदार व्यक्तिमत्व होते. त्यांना टापटीप रहायला आवडायचे. ते कधीच अजागळ दिसले नाहीत. ल्युटियन्स दिल्लीत रहाणे आणि श्रीमंती यामुळे त्यांचे रहाणीमानही तसेच होते. त्यांना महागडी घड्याळे विकत घ्यायला आवडायचं. ज्याकाळात भारतीय ’ओमेगा’च्या पुढचा विचारही करू शकत नव्हते, त्याकाळात त्यांनी ’पॅटेक फिलिप’ घड्याळ घेतले होते. अरूण जेटलींकडे ’माँ ब्लाँ’ पेनांचा आणि जामवार शालींचा संग्रहदेखील मोठा आहे. नवीन एडिशनचं ’माँ ब्लाँ’ पेन सगळ्यात आधी घेणार्‍यांमध्ये अरूण जेटली असायचे. अनेकदा जर हे पेन भारतात मिळालं नाही तर प्रसिद्ध प्रत्रकार कुलदीप नय्यर यांचा मुलगा आणि जेटलींचा मित्र राजीव नैय्यर यांच्याकडून ते परदेशातून पेन मागवून घेत. त्या काळात अरूण जेटली लंडनमध्ये तयार करण्यात आलेले ’बिस्पोक’ शर्ट्स आणि हाताने तयार करण्यात आलेले ’जॉन लॉब’चेच बूट घालायचे. ते नेहमी ’जियाफ ट्रम्पर्स’चं शेव्हिंग क्रीम आणि ब्रशचा वापर करायचे.

अरूण जेटलींना चांगलं खायची हौस होती. दिल्लीतल्या सर्वात जुन्या क्लब्सपैकी एक असणार्‍या रोशनारा क्लबचं जेवण त्यांना अतिशय आवडायचं. कॅनॉट प्लेसच्या प्रसिद्ध ’क्वालिटी’ रेस्टॉरंटचे चने-भटूरे तर त्यांना नेहमीच आवडायचे. जुन्या दिल्लीमधल्या स्वादिष्ट जिलेब्या, कचोर्‍या आणि रबडी-फालुदा खात जेटली लहानाचे मोठे झाले. पण मधुमेहाचं निदान झाल्यानंतर ही सगळी आवड मागे पडली आणि जेवण फक्त एक चपाती आणि भाजीपुरतंच राहिले.

- Advertisement -

शत्रूलाही मित्र बनवले

जेष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी भाजपत असतानापासून अरुण जेटलींना शत्रू मानत आले होते. तो त्यांच्या व्यक्तीगत मामला होता. दिल्ली क्रिकेटच्या संदर्भात आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी अरूण जेटली यांच्यावर बेताल आरोप केले तेव्हा जेटलींनी बदनामीचा खटला दाखल केला. तर जेटलींवरचा राग काढण्यासाठी जेठमलानी केजरीवाल यांचे वकीलपत्र घेऊन उभे राहिले. त्यामुळे केजरीवाल खुश होते, कारण त्यांना नामांकित वकील मिळालेला होता, जेठमलानी यांनी ती संधी घेऊन कोर्टात उलटतपासणी करताना जेटली यांच्यावर गलिच्छ शब्दात आरोप केले व अपशब्दांचा वापर केला. तितक्याच ताकदीचे वकील असल्यामुळे जेटली यांनी तिथेच उलटा प्रश्न केला. जेठमलानी आपल्या बुद्धीने असे शब्द वापरत आहेत, की अशील केजरीवाल यांच्या सूचनेनुसार अपशब्द वापरत आहेत? तेव्हा जेठमलानी यांनी केजरीवालनीच हे शब्द वापरण्यास सांगितल्याचा निर्वाळा दिला. कोर्टाने सुनावणीतून ते शब्द काढून टाकले आणि जेटली यांना आणखी एक खटला भरण्याची मोकळीक दिली. आता त्यात खरेखोटे करण्यासाठी कोर्टाने विचारणा केली असता, केजरीवाल यांनी आपण अपशब्द वापरले नाहीत, असे स्पष्ट केले. त्यामुळे जेठमलानी खवळले आणि त्यांनी केजरीवाल यांचे वकीलपत्र सोडून दिल्याची घोषणा केली. पण तिथेच न थांबता त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना पत्र लिहून प्रत्यक्ष भेटीमध्ये जेटलींच्या विरोधात अपशब्द वापरलेले असल्याची लेखी आठवण करून दिली आहे. म्हणजे गंमत अशी झाली आहे, की कालपर्यंत केजरीवाल यांची वकिली करणारे जेठमलानी जेटली यांच्यासाठी दुसर्‍या खटल्यातले मुख्य साक्षीदार होऊन गेले. प्रसंगी शत्रूलाही मित्र करण्याची अजब कला जेटलींना साध्य झाली होती.

जेटलींच्या मुलाचा मोदींना निरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली हे एकमेकांचे चांगले मित्र. अनेक आंदोलने, चळवळीत त्यांनी एकत्र काम केले आहे. अरुण जेटली आजारी असताना मोदी अनेकवेळा त्यांना एम्स हॉस्पिटलमध्ये भेटायलाही गेले होते. सध्या पंतप्रधान मोदी हे परदेश दौर्‍यावर आहेत. अरुण जेटली यांच्या निधनाची बातमी त्यांना परदेश दौर्‍यावर कळली. त्याबरोबर मोदींनी जेटलींच्या कुटुंबियांना फोन करून दु:ख व्यक्त केले. आपला परदेश दौरा सोडून पंतप्रधान मोदी भारतात यायला निघाले होते. मात्र जेटली यांचे पुत्र रोहन जेटलींनी त्यांना रोवले. परदेश दौरा अर्धवट सोडून भारतात परतू नका असे सांगितले. त्यामुळे मोदींनी आपला परदेश दौरा कायम ठेवला आहे.

- Advertisement -

जेटलींच्या निधनाची बातमी समजल्यानंतर मोदींनाही अतीव दुःख झाले. बातमी समजल्यानंतर मोदींनी लागलीच जेटलींच्या पत्नी संगीता आणि मुलगा रोहन यांच्याबरोबर फोनवरून संवाद साधला. देशाला प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी तुम्ही परदेश दौर्‍यावर गेला आहात. त्यामुळे तुम्ही तो दौरा अर्धवट सोडून भारतात परतू नका. कोणत्याही व्यक्तीपेक्षा देश हा सर्वात पहिल्यांदा येतो. म्हणून तुमचा हा दौरा पूर्ण करूनच भारतात परता, अशा शब्दांमध्ये रोहन जेटलींनी मोदींकडे भावना व्यक्त केल्या.

जेटली कोणत्या गोटातले

अरुण जेटली हे अजातशत्रू होते. त्यांनी केवळ भाजपतच नव्हेतर पक्षाबाहेरही अनेक मित्र जमवले होते. गोटातल्या राजकारणाचीच माहिती असलेल्या मीडियाला जेटली हे नेमके कोणच्या गोटातले हे शेवटपर्यंत समजले नाही. १९९८ साली केंद्रात जेव्हा अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्त्वाखालील सरकार स्थापन झाले तेव्हा जेटलींना राज्यमंत्रीपद मिळाले होते. त्यावेळी जेटली यांचा उल्लेख ते वाजपेयी यांच्या गोटातले असा हमखास केला जायचा. मात्र हा फुगा लवकरच फुटला.

२००२ साली गुजरात दंगलीनंतर वाजपेयींनी गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना राज धर्माचे पालन करण्याचा सल्ला दिला. तेव्हा जेटली यांनी नरेंद्र मोदींचे समर्थन केले. इतकेच नव्हेतर गुजरात दंगलीचा खटलाही जेटली यांनी मोदींच्या बाजूने लढला. त्यावेळी जेटली एकदम तत्कालिन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या गोटातले झाले. कारण अडवाणी यांचा मोदींना पाठिंबा असल्याचे सांगितले जात होते. वाजपेयींच्या गोटातून मीडियाने जेटलींना अडवाणींच्या गोटात नेले असले तरी वाजपेयींबद्दल जेटली यांचा आदर आणि सन्मान तुसभरही कमी झाला नव्हता.

किंबहुना ते वाजपेयींच्या नेतृत्त्वाखालीच काम करत होते. भाजपचे सरकार गेल्यानंतरही जेटली हे अडवाणी यांच्या गोटातले म्हणून मानले जात होते. २०१३ सालापर्यंत जेटली हे अडवाणी यांच्याच गोटात होते. मग त्यांना अचानक नरेंद्र मोदींच्या गोटात घालण्यात आले. २०१३ साली गोव्यातील बैठकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना निवडण्यात आले. त्यावेळी अडवाणींचा अवमान झाल्याचा आरोपही करण्यात आला. तेव्हापासून जेटली यांना मीडियाने अचानक अडवाणी यांचा गोटा सोडून नरेंद्र मोदींच्या गोटात टाकले. 2014मध्ये अमृतसरमधून निवडणूक हरल्यानंतरही नरेंद्र मोदींनी त्यांना मंत्रिमंडळात जागा तर दिलीच पण त्यांच्याकडे अर्थ आणि संरक्षण यासारख्या दोन मह्त्त्वाच्या खात्यांची जबाबदारीही दिली.

…आणि मोदींच्या पत्नीवरून टीका थांबली

नरेंद्र मोदी आणि भाजप अडचणीत सापडले की अरुण जेटली त्यांच्या मदतीला हमखास धावून यायचे. वकिली युक्तीवाद आणि योग्य पुराव्यांच्या भडीमार करून ते विरोधकांना नामोहरण करत असत. त्यामुळे त्यांना बर्‍याचवेळा भाजपचे तारणहार असेही म्हटले जात. ल्युटियन्स दिल्लीच्या वर्तुळात वावरत असल्यामुळे जेटली यांना विरोधकांची चिल्लीपील्ली माहिती होती. त्यामुळे विरोधक त्यांच्या वाटेला सहसा जात नसत. जेटली आपल्या हजरजबाबीपणामुळे कुठल्याही आरोपाला तोंड देण्यास समर्थ ठरत.

असाच एक किस्सा २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा आहे. २०१४ निवडणूकपूर्व काळात मोदींच्या बायकोचा मोदींच्या अर्जात उल्लेख मिळताच काँगेसने नरेंद्र मोदी यांच्यावर चिखलफेक सुरू केली. त्यावर जेटलींनी एक जबरदस्त टोला हाणला ते म्हणाले, असलेली बायको मोदींनी “लिहिली” यावर एवढा गोंधळ? आमचे एक माजी प्रधानमंत्री “असलेली” बायको सोडून “नसलेली” तीही “दुसर्‍याची” जन्मभर मिरवत होते, त्याचा उल्लेख नावानिशी करू का?, असे जेटली म्हणाले. जेटली यांच्या या टोल्यानंतर काँग्रेस मात्र नरेंद्र मोदी यांच्या पत्नीवरून मोदींना लक्ष्य करायचे सोडून दिले. मात्र सभ्यता पाळून जेटली यांनी त्या माजी पंतप्रधानांचे नाव कधीच जगजाहीर केले नाही की कोणाला सांगितलेही नाही.

जनधन ते जीएसटी

अरुण जेटली यांनी देशाच्या राजकारणात आपली छाप सोडली. जेटली अर्थमंत्री असताना नोटाबंदीपासून सुकन्या समृद्धीपर्यंत योजनांच्या अंमलबजावणीमुळे जेटली हे भारतीय इतिहासात अजरामर झालेले आहेत. त्यांचे विरोधकही या योजनांची प्रशंसा करतात.

नोटाबंदीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा करत 1000 आणि 500च्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. जेणेकरून काळा पैशाला लगाम घालता येईल. मोदींच्या या निर्णयाला केंद्रीय रिझर्व्ह बँकेनं अवघ्या 4 तासांत मंजुरी दिली. या निर्णयाची पूर्ण रणनीती गोपनीय पद्धतीने आखण्यात आली होती. त्यात अर्थमंत्री अरुण जेटलींची मुख्य भूमिका होती.

जनधन योजनाः जनधन योजनेंतर्गत आज देशभरात 35.39 कोटींहून अधिक लोकांनी बँक खाती उघडली आहेत. जनधन योजनेच्या माध्यमातून सामान्य व्यक्तीला पैसे वाचवण्यासाठी प्रेरित करण्यात आले आहे. मोदी सरकारनं 2014मध्ये जनधन योजनेची सुरुवात केली. जेटलींच्या यशस्वी रणनीतीमुळे ही योजना यशस्वी झाली.

जीएसटी: जीएसटी(वस्तू आणि सेवा कर)चा अर्थ एक राष्ट्र, एक टॅक्स असा आहे. अर्थमंत्री झाल्यापासून जेटली जीएसटीचा पुरस्कार करत होते. परंतु जीएसटी राबवण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते. ती हिंमत जेटलींनी दाखवली. जीएसटी ही आर्थिक क्षेत्रातल्या सुधारणांपैकी एक महत्त्वाचे पाऊल आहे. जीएसटीच्या नावासोबतच जेटलींची आठवण आता कायमची जोडली गेली आहे.

आयुष्यमान भारत: आयुष्यमान भारत ही मोदी सरकारची यशस्वी योजना आहे. अरुण जेटलींनी 2018-19मध्ये अर्थसंकल्प मांडताना या योजनेची घोषणा केली होती. ही योजना 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपासाठी फायदेशीर ठरली आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत येणार्‍या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा पुरवला जातो. जेटलींच्या आग्रहामुळे ही योजना लागू झाली आहे.
मुद्रा योजना: मुद्रा योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या सुरुवातीपासून तिला यशस्वी बनवण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने विशेष योगदान दिले होते. मोदी सरकारच्या कार्यकाळात एप्रिल 2015मध्ये या योजनेची सुरुवात झाली होती.

मोदी, शहांनी अशक्य साध्य केले

जेटली यांचा शेवटचा ब्लॉग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अशक्य ते साध्य केले. तिहेरी तलाख, दहशतवादविरोधी कायदा आणि कलम ३७० बद्दल ऐतिहासिक निर्णय घेतले. राज्यसभेत दोन-तृतीयांश बहुमतांनी ही विधेयक संमत होणे हे आपल्या कल्पनेच्या पलिकडचे आहे, असे अरुण जेटली यांनी आपल्या शेवटच्या ब्लॉगमध्ये लिहिले होते. त्यांनी या आपल्या ब्लॉगमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची प्रशंसा केली आहे.

ऐतिहासिक विधेयके मंजूर झाल्यामुळे संसदेचे चालू अधिवेशन सर्वात फलदायी ठरले. तिहेरी तलाक विरोधी कायदा, दहशतवाद विरोधी कायदा बळकट करणे आणि कलम ३७० रद्द करणे हे सर्व निर्णय अभूतपूर्व असल्याचे जेटली यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले होते. कलम ३७० रद्द करण्याच्या विधेयकाला जनरेट्यामुळे विरोधकांनाही पाठिंबा द्यावा लागला. त्यांना देशाच्या जनतेच्या मनात काय चालले आहे हे कळले आणि लोकांचा संताप सहन करावा लागू नये म्हणून त्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. काँग्रेस पक्षाने ३७० कलमाची अडचण निर्माण केली आणि त्यानंतरही त्या अडचणीत भर टाकली. राहुल गांधी यांनी जेएनयूमधील तुकडे-तुकडे गँगला दिलेल्या पाठिंब्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचीही मने बिथरली. काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया या डोके नसलेल्या कोंबड्याप्रमाणे होत्या. त्यामुळे काँग्रेस पुन्हा देशातील जनतेपासून लांब गेली. नवीन भारत बदलला आहे पण काँग्रेसला त्याची जाण नाही, असे जेटली यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. कलम ३७० बद्दल बर्‍याच वर्षांपासून पक्षाकडून दिले जाणारे आश्वासन पाळल्याबद्दल अरुण जेटली समाधानी होते. भाजपाच्या विरोधकांना कलम ३७० हटवणे अशक्य वाटत होते. आजारी असतानाही जेटली यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून सरकारचे समर्थन आणि विरोधकांना टोले हाणले आहे.

जेटली आणि बारामती

देशाचे अर्थमंत्री असताना अरुण जेटली २०१५ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीला येऊन गेले. तिथे त्यांचा यथेच्छ पाहुणचार करण्यात आला. सहाजिकच जेटली यांनी यजमानांच्या बाबतीत चार शब्द चांगले बोलणे क्रमप्राप्त होते. सतत राजकीय विरोध करूनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पवारांना नेहमी आपला मित्र मानत आले. शरदबाबू पंतप्रधान होणार असतील, तर त्यांना शिवसेनेचा पाठींबाच राहिल, असे सेनाप्रमुख खुलेआम सांगायचे. तर जेटली यांनी पवारांच्या बारामतीचे कोडकौतुक केल्यास वावगे काय असू शकते? पण आठ महिन्यांपूर्वी व्हेलेन्टाईनडे अशा मुहूर्तावर खुद्द पंतप्रधानांनी पवारांचे असेच कौतुक केले असल्याने, अनेकांना त्याची छाया जेटलींच्या विधानावर पडलेली दिसली आणि अपेक्षेप्रमाणे टिकेचे मोहोळ उठले. त्याचे कारण वेगळे आहे. मागल्या दोन वर्षात मोदींनी देशामध्ये शंभर स्मार्ट सिटीज म्हणजे शहरे विकसित करण्याची भाषा केलेली आहे. तर जेटली यांनी देशात शंभर बारामती असल्या तर विकासाची गंगा दुथडी भरून वाहू लागेल, अशी ग्वाही दिलेली. त्यातला शंभर आकडा अनेकांना खटकला. जेटली-मोदी बारामतीलाच स्मार्ट सिटी समजतात काय, अशी शंकाही त्यामागे घेण्यात आली. बारामतीचे कौतुक करणार्‍यांना त्याहीपेक्षा स्मार्ट असलेल्या लवासाचे स्मरण होत नाही, असेही म्हटले गेले.

एका वर्षात भाजपने गमावले चार नेते

हे वर्ष भारतीय जनता पक्षासाठी खूपच वाईट गेले. या वर्षात भाजपने त्यांच्या पहिल्या फळीतील चार मोठे आणि कर्तृत्त्ववान नेते गमावले. ज्यांनी भाजपला सत्तेत आणण्यासाठी जीवाचे रान केले होते. कठिण प्रसंगी पक्षाची साथ सोडली नाही. उलट पक्षासाठी आपले कौटुंबिक आयुष्यही प्रसंगी पणाला लावले. या लढवय्या नेत्यांच्या अचानक एक्झिटमुळे भाजपचे मोठे नुकसान झाले आहे.

अनंत कुमार (जन्म: २२ जुलै १९५९ मृत्यू: १२ नोव्हेंबर २०१८) हे एक भाजपचे खासदार, सोळाव्या लोकसभेचे सदस्य आणि रसायन व खत मंत्री होते. बंगळूर दक्षिण मधून लोकसभेत सतत सहा वेळा निवडून गेलेले अनंत कुमार कर्नाटकामधील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते होते.

मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रीकर (जन्म: १३ डिसेंबर १९५५ मृत्यू: १७ मार्च २०१९) २००० ते २००५ आणि २०१२ ते २०१४, तसेच १४ मार्च २०१७ ते १७ मार्च २०१९ या कालावधीत गोवा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर होते. तसेच ते देशाचे संरक्षणमंत्री ही होते. संरक्षणमंत्रीपद भूषवल्यानंतर ते पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले होते.

सुषमा स्वराज कौशल (जन्म : १४ फेब्रुवारी १९५२ मृत्यू : ६ ऑगस्ट २०१९) या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकील व भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या होत्या. त्या २६ मे २०१४ पासून ते २०१९पर्यंत भारताच्या परराष्ट्र मंत्री होत्या; इंदिरा गांधीनंतर हे पद घेणार्‍या त्या दुसर्‍या महिला होत्या. त्या संसदेच्या सदस्य म्हणून सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या होत्या.

अरुण जेटली (जन्म:२८ डिसेंबर १९५२ मृत्यू : २४ ऑगस्ट २०१९) हे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते होते. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते देशाचे अर्थमंत्रीहहोते. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री होते. २००० सालापासून ते राज्यसभेचे सदस्य होते. ३ जून २००९ रोजी त्यांची राज्यसभेतील विरोधीपक्षनेते म्हणून नियुक्ती झाली होती.

भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी आज निधन झोले. दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ९ ऑगस्टपासून एम्सच्या टीमने त्यांना निरीक्षणासाठी ठेवले होते. पण त्यांची तब्येत सातत्याने खालावत गेल्याचे आज एम्सकडूनही जाहीर करण्यात आले. अरूण जेटलींच्या निधनानंतर केवळ भाजपा नाही तर इतर पक्षांच्या नेत्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे.
– माधव भांडारी, प्रवक्ते भाजपा

खूप मोठा धक्का भाजपाला बसला आहे. अरुण जेटली हे नम्र होते. त्यांनी अनेक प्रकारच्या जबाबदारी पार पाडल्या. जीएसटी सारखा निर्णय त्यांनी घेतला. ते देखील सर्व पक्षांना सोबत घेऊन
– चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष

माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या रूपात देशाने एक अभ्यासू राजकारणी आणि निष्णात विधीज्ञ गमावला आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
– अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री

त्यांच्या जाण्यामुळे मोठे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. जीएसटी असो वा नोटबंदी याची अंमल बजावणी त्यांनी केली. त्यांच्या बुद्धीमत्तेबद्दल आणि प्रामाणिकतेवर अजिबात शंका नव्हती.
-पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

अरुण जेटली यांचे वय जाण्याचे नव्हते. त्यांच्या खांद्यावर अनेक जबाबदार्‍या होत्या. मोदी यांचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर हवे ही भुमीका मांडणारे जेटली होते. कधीही भरून न येणारे हे देशाचे नुकसान आहे.जेव्हा जेव्हा देशावर संकट आले तेव्हा जेटली यांनी बाजू मांडली. राजकारणा पलीकडील जेटली यांचे व्यक्तिमत्व होते.
– संजय राऊत, खासदार शिवसेना

आमच्या पक्षाची नाही तर देशाची मोठी हानी झाली. सुषमाजी आणि त्यानंतर आता अरुणजी आमच्यातून निघून गेले त्यामुळे खूप मोठी हानी झाली. राजकीय विश्वातले खुप मोठे असे व्यक्तिमत्व होते. त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता होती. -गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -