सर्वसामान्यांना ‘एवढ्या’ रुपयांत मिळणार ‘कोविशिल्ड’ लसीचे डोस

Serum CEO Adar Poonawalla reveals corona vaccine price
सर्वसामान्यांना 'एवढ्या' रुपयांत मिळणार 'कोविशिल्ड' लसीचे डोस

जगात अजूनही कोरोनाचा कहर कायम आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगातील अनेक देश कोरोना लस विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. काही कोरोना लसीच्या चाचण्या तिसऱ्या टप्प्यात आल्या आहेत.  पण कोरोना लस नक्की कधी उपलब्ध होणार?, लसीसाठी किती पैसे मोजावे लागणार, असे अनेक प्रश्न सध्या सर्वसामन्यांच्या मनात निर्माण होत आहेत. याबाबत कोरोना लस तयार करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितले की, ‘कोविशिल्ड लसीचे डोस ५०० रुपयांत मिळणार आहे आणि येत्या २०२१च्या तिमाहीत भारतात कोरोना लस उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.’ २०२४ पर्यंत प्रत्येक भारतीयाला कोरोना लसीचे लसीकरण केले जाईल, असे पुनावाल यांनी म्हटले आहे.

तसेच सध्या कोविशिल्ड लसीची अंतिम चाचणी सुरू आहे. या अंतिम चाचणीचा अहवाल सकारात्मक आला तर तीन महिन्यात या लसीकरणाला सुरुवात होणार आहेत, असे पुनावाला यांनी स्पष्ट केले आहे. एका मुलाखतीत अदार पूनावाला यांनी सांगितले की, ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीचे ३० ते ४० कोटी डोस २०२१च्या पहिल्या तीन महिन्यात उपलब्ध होतील. यासाठी सर्वसामान्य लोकांना ५०० ते ६०० रुपये मोजावे लागतील. भारत सरकारला ही लस स्वस्त दरात दिली जाईल. भारत आमची प्राथमिकता असल्याचे ते म्हणाले.

भारताच्या बायोटेकची कोरोना लस ‘कोव्हॅक्सिन’ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. भारत बायोटेक कंपनीने कोरोनाच्या लसीसाठी आयसीएमआरसोबत भागीदारी केली आहे. सोमवार (१६ नोव्हेंबर) पासून या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. तसेच अमेरिकेतील दुसरी आणि महत्त्वाची लस उत्पादक कंपनी मॉडर्नाने आपली लस ९४.५ टक्के प्रभावी असल्याचा दावा देखील सोमवारी केला. लेट-स्टेज क्लिनिकलच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार कंपनीने हा दावा केला आहे.


हेही वाचा – दिल्लीनंतर अहमदाबादमध्येही कोरोनाचा फैलाव वाढला,कडक उपाययोजनांची तयारी