राऊतांचा मोदींना सल्ला, ‘महाराष्ट्रातील स्वपक्षीयांना एवढे सांगितले तरी मोठी राष्ट्रसेवा घडेल’

shiv sena mp sanjay raut suggestion to pm narendra modi for corona padnimc
राऊतांचा मोदींना सल्ला, 'महाराष्ट्रातील स्वपक्षीयांना एवढे सांगितले तरी मोठी राष्ट्रसेवा घडेल'

एकाबाजूला राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला सुरुवात झाली आहे. दिल्लीबरोबरच राज्यात कोरोनाबाधित रुग्ण वाढताना दिसत आहे. तर दुसऱ्याबाजूला अनेक मुद्द्यांवरून राज्यातील भाजप नेते ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देशातील कोरोना परिस्थितीकडे लक्ष वेधत भाजप नेत्यांवर रोकठोक सदरातून टिकास्त्र सोडले आहे. तसेच एखाद्या राष्ट्रीय संदेशात स्वपक्षीयांना कोरोनाचे राजकारण थांबवा, एवढे पंतप्रधानांनी सांगितले तरी मोठी राष्ट्रसेवा घडेल, असा संजय राऊत यांनी मोदींना सल्ला दिला आहे.

रोखठोक सदरातून काय म्हणाले संजय राऊत?

‘दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली आहे, पण ही तिसरी लाट आहे असे जाणकार सांगतात. बुधवारी मी दिल्लीत होतो. त्या चोवीस तासांत कोरोनाचा स्फोट झालेला मी पाहिला. एका दिवसात साधारण साडेसात हजार कोरोना रुग्ण झाले. त्या चोवीस तासांत १५० म्हणजे सर्वाधिक मृत्यू झाले. हे सर्व का घडले, तर दिल्ली सरकारने सर्व काही उघडण्याची घाई केली. त्या फाजील आत्मविश्वासातून हे संकट वाढले. राजधानीत कोरोना संक्रमण वाढत असताना सरकार काय करत होते? ज्यांनी आपल्या आप्तांना या दहा दिवसांत गमावले त्यांना सरकार काय जवाब देणार? असा सवाल आता दिल्ली हायकोर्टाने केजरीवाल सरकारला विचारला. दिल्लीत पुन्हा ‘लॉकडाऊन’ची तयारी सुरू आहे. बाजार, दुकाने, सार्वजनिक स्थळे आणि प्रार्थनास्थळे पुन्हा बंद केली जातील. हे का घडले याचा विचार महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी करायला हवा’, असा टोला संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर लगावला आहे.

गर्दी जमवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांचा होताच

पुढे संजय राऊत म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील भाजपा पुढाऱ्यांनी सध्या ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या विरोधासाठी विरोध करण्याच्या आहेत. पाच वर्षे ज्यांनी राज्याची निरंकुश सत्ता भोगली त्यांनी किमान नीतिनियमांचे भान ठेवायला हवे. मुंबईत छठपूजेला परवानगी द्यावी या मागणीसाठी भाजपावाले आंदोलन करीत होते. बिहारची निवडणूक भाजपाने जिंकली हे खरे, पण मुंबईतील बिहारी जनतेस छठपूजेच्या वादात ओढण्याचे कारण नाही. छठपूजेसाठी समुद्रकिनारी एकाच वेळी हजारो लोक गोळा होतात व करोना संकटकाळात ते नियमबाह्य आहे. छठपूजा २० नोव्हेंबरला पार पडली, पण गर्दी जमवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांचा होताच. मुंबईत ज्यांनी छठपूजेसाठी आंदोलन केले त्यांनी इतर राज्यांत काय घडले ते पाहायला हवे.’

भाजपसारख्या पक्षांची तशी इच्छा असेल तर ते राज्याचे दुर्दैव!

‘महाराष्ट्रात मंदिरे उघडा यासाठी जो गोंधळ घातला तो राजकीय होता. मंदिरे उघडण्याचा निर्णय घेत नाही, त्यामुळे ‘ठाकरे सरकार’ हिंदुत्वाच्या विरोधी असल्याची बोंब ठोकणे हे सरळ सरळ ढोंग आहे. हरयाणात भाजपचे सरकार आहे. तेथे शाळा उघडण्याचा निर्णय घेतला, पण ७२ तासांत पाचशेहून जास्त विद्यार्थी आणि शिक्षक कोरोनाबाधित झाले. बिहारात विजय मिळवला म्हणून करोनावरही विजय मिळवता येईल असे कोणाला वाटते काय? कोरोनाच्या लढाईशी जे हिंदुत्ववादाचा संबंध जोडत आहेत ते जनतेचे शत्रू आहेत. दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू आहे. महाराष्ट्रावर ही वेळ येऊ नये. भाजपसारख्या पक्षांची तशी इच्छा असेल तर ते राज्याचे दुर्दैव! पुन्हा देशाचे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा या विषयावर जाहीरपणे काहीच बोलायला तयार नाहीत. बिहार जिंकले, आता प. बंगाल जिंकायचे असे भाजपने ठरवले असेल तर तो त्यांचा प्रश्न, पण खरे संकट कोरोना, घसरलेल्या अर्थव्यवस्थेचे. त्यावर कधी विजय मिळवणार? दिल्लीवर कोरोनाने हल्ला केला आहे. त्याच दिल्लीत राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी राहतात. त्यांच्या डोळ्यासमोर लोकांचे बळी जात आहेत. एखाद्या राष्ट्रीय संदेशात स्वपक्षीयांना करोनाचे राजकारण थांबवा, एवढे पंतप्रधानांनी सांगितले तरी मोठी राष्ट्रसेवा घडेल,’ असा सल्ला राऊतांनी यांनी मोदींना दिला आहे.