बिहार निवडणुक : शिवसेनेने मोडला आम आदमी पार्टीचा रेकॉर्ड

शिवसेनेच्या ७० पैकी ७० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

बिहार निवडणुकांना सामोरे जाताना शिवसेना पक्षाकडून मोठी हवा करण्यात आली होती. पण शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा हा बिहार निवडणुकांच्या निमित्ताने जोरदार असा फुटला आहे. शिवसेनेला एकाही जागेवर दमदार कामगिरी करता आलेली नाही. शिवसेनेने ७० ठिकाणी उमेदवार उभे केले होते, पण एकाही उमेदवाराची डिपॉझिटची रक्कम शिवसेनेला राखण्यात यश आले नाही. एकुण ७० पैकी ७० जागी शिवसेनेचे डिपॉझिट जप्त झाल्याची आकडेवारी बिहार निकालाअंती समोर आली आहे. त्यामुळे निवडणुकांआधी मोठमोठ्या दाव्यांची घोषणा करणाऱ्या शिवसेनेचे पुर्णपणे भुईसपाट झाल्याचे चित्र बिहारमध्ये पहायला मिळाले. शिवसेनेच्या उमेदवारांना झालेल्या मतदानापेक्षा अनेक ठिकाणी मतदारांनी वापरलेल्या नोटा पर्यायाचा आकडा मोठा होता. बिहार निवडणुकांच्या निमित्ताने शिवसेनेने आम आदमी पक्षाचाही रेकॉर्ड मोडला आहे. दिल्ली निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाच्या ६३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. पण शिवसेनेच्या ७० पैकी ७० उमेदवारांचे डिपॉझिट बिहार निवडणुकांच्या निमित्ताने जप्त झाले आहे.

शिवसेनेने बिहार निवडणुकांना सामोरे जाताना शेवटपर्यंत किती जागा लढणार हा सस्पेंन्स कायम ठेवला होता. सुशांत सिंह प्रकरणाच्या निमित्ताने शिवसेनेला टार्गेट करणाऱ्या डीजीपींनाही शिवसेनेने या निवडणुकीच्या निमित्ताने टार्गेट केले होते. तसेच बिहारमध्ये शिवसेना चांगली कामगिरी करेल असा विश्वास शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनीही वेळोवेळी घेतलेल्या पत्रकार परिषदांमधून व्यक्त केला होता. पण एकुणच शिवसेनेने बिहारमध्ये निवडणुकांचे वातावरण तापलेले असताना अतिशय सुमार कामगिरी केली. शिवसेनेसारखीच अवस्था ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही एकाही ठिकाणी चमकदार कामगिरी करता आली नाही. जशी शिवसेनेच्या उमेदवारांची मतदारांची कमी आकडेवारी होती, तशीच आकडेवारी ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या बाबतीतही पहायला मिळाली. राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे अनेक ठिकाणी डिपॉझिटही जप्त झाले. पण या उमेदवारांपेक्षा नोटाचा पर्याय मतदारांनी वापरला असल्याचे चित्र होते.

हरलेल्या पहिलवानास विजयाचे पदक
बिहारात पुन्हा नितीशकुमार येत आहेत, पण लोकांचा तसा कौल आहे का? स्पष्टच सांगायचं तर बिहारला भाजप आणि राष्ट्रीय जनता दल या भिन्न टोकांच्या पक्षांना यश मिळाले आहे. त्यात नितीशकुमार व त्यांचा पक्ष कोठेच नाही. मुख्यमंत्री म्हणून जनतेने त्यांना झिडकारल्यावर मुख्यमंत्रीपदी त्यांना लादणे हा लोकमताचा अवमान आहे,” अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनामधून करण्यात आलेली आहे. नितीशकुमारांनी मुख्यमंत्री म्हणून चढाई केलीच तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची ती दारुण शोकांतिका ठरेल, असेही सामनाच्या अग्रलेखात नमुद करण्यात आले आहे. नितीशकुमार मुख्यमंत्री होती, पण भारतीय जनता पक्षाच्या तालावर त्यांना काम करावे लागेल. हरलेल्या पहिलवानास विजयाचे पदक देण्यासारखाच तो सोहळा ठरेल असेही शिवसेनेने म्हटले आहे.