घरटेक-वेकआरोग्य सेतु अ‍ॅपमध्ये त्रुटी दाखवा आणि मिळवा ३ लाख रुपये

आरोग्य सेतु अ‍ॅपमध्ये त्रुटी दाखवा आणि मिळवा ३ लाख रुपये

Subscribe

सरकारने आरोग्य सेतू अ‍ॅपसाठी बग बाउंटी प्रोग्राम आणला आहे. आरोग्य सेतु अ‍ॅपमध्ये त्रुटी दाखवल्यास ३ लाखांपर्यंत बक्षिस दिलं जाणार आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी सरकारने आरोग्य सेतू अ‍ॅपसाठी बग बाउंटी प्रोग्राम आणला आहे. कोविड-१९ संपर्क ट्रेसिंग अ‍ॅप आरोग्य सेतुचा सोर्स कोड देखील एनआयसीने जाहीर केला आहे, ज्याच्या मदतीने अॅपमध्ये त्रुटी शोधू शकता. वास्तविक, आरोग्य सेतु अ‍ॅपच्या सेफगार्डिंगवर अनेक तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले होते, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बग्स, त्रुटी आणि चांगल्या कोडचा अहवाल देणाऱ्यांना सरकार रोख बक्षिसेही देणार आहे.

आरोग्य सेतु अॅपच्या अँड्रॉइड व्हर्जनचा सोर्स कोड सरकारने सामायिक केला आहे आणि असं म्हटले आहे की सुमारे ९८ टक्के वापरकर्ते अँड्रॉइड अ‍ॅप वापरत आहेत. तथापि, लवकरच आरोग्य सेतुच्या iOS आणि KaiOS आवृत्त्यांचा स्त्रोत कोड देखील सामायिक केला जाईल. या अ‍ॅपच्या अँड्रॉइड व्हर्जनचा सोर्स कोड गीटहबवर लाइव्ह आहे आणि नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) बग-बाऊंटी प्रोग्राम देखील जाहीर केला आहे. या कोडच्या मदतीने संशोधक अ‍ॅप सुधारण्यास मदत करतील. या निर्णयाचे संशोधकांनी स्वागत केले आहे. भारतीय तंत्रज्ञान कंपनी द डायलॉग म्हणाली की असे केल्याने अॅपवर लोकांचा फक्त विश्वास वाढणार नाही तर चांगला अभिप्राय मिळेल.

- Advertisement -

सर्वात मोठा मुक्त स्रोत अ‍ॅप

iOS व्हर्जनचा सोर्स कोडही येत्या दोन आठवड्यांत प्रसिद्ध होईल, असे नीती आयोग टीमने म्हटलं आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले की, आरोग्य सेतु अॅपचे ओपन-सोर्सिंग हे स्वत: मध्ये अद्वितीय आहे कारण जगात कुठेही इतकं मोठं सरकारी प्रोडक्ट खुलेआम झालेलं नाही. आरोग्य सेतुच्या सर्व प्लॅटफॉर्मवर एकूण ११ कोटीहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते आहेत. सरकारने असं म्हटलं आहे की अॅपने कोरोना विषाणूविरूद्ध १ लाख ४० हजाराहून अधिक वापरकर्त्यांना सतर्क केलं आहे.


हेही वाचा – परीक्षा रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना पत्र

- Advertisement -

एकूण तीन लाख रुपयांचं बक्षीस

अ‍ॅप सुधारण्यासाठी बग बाउंटी प्रोग्रामदेखील सुरू करण्यात आला आहे आणि अ‍ॅपमधील कोणत्याही सुरक्षा त्रुटी शोधून काढण्यासाठी ३ लाख रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस दिले जाईल. याव्यतिरिक्त, सर्व क्वालिफाय झालेल्यांना प्रमाणपत्रं दिलं जाणार आहे तसंच बग किंवा सुरक्षितता जोखमीवर आधारित पुरस्कार दिला जाणार आहे. या कार्यक्रमांमध्ये केवळ भारतातील संशोधकच सहभागी होऊ शकतील. जर भारता बाहेरील संशोधकांनी अहवाल पाठवला तर त्यांना प्रमाणपत्र मिळेल परंतु त्यांना बक्षीस मिळणार नाही. २७ मेपासून सुरू झालेला हा कार्यक्रम २६ जून पर्यंत चालणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -