अनंतपुरम येथील हिंदुपुरम भागात एकादिवसाचं अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. रविवारी कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून अर्भकाचा रडण्याचा आवाज आल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना कळवले. हे अर्भक मुलीचे असून जवळील रुग्णालयात अर्भकावर उपचार चालू आहेत. दरम्यान, अर्भकाला कचरा पेटीत कोणी टाकले, याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. समानतेच्या जगात मुलींच्या जन्माला अजूनही विरोध केला जात आहे, अशी खंत व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुपुरम भागातील रहिवाशांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. कचरा टाकायला गेलेल्या एका व्यक्तीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर अर्भकाचे रडण्याचे आवाज येऊ लागले. त्या व्यक्तीने जवळ जाऊन पाहिले तर, त्याला एका कपड्यात गुंडाळलेले अर्भक दिसले. अर्भकाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून काढल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना कळवले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस त्या ठिकाणी पोहचले. हे अर्भक मुलीचे असल्यामुळे टाकण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. अर्भकाला जवळील रुग्णलयात तपासणी करण्यासाठी पाठवले. दरम्यान, अर्भकाला कचरा पेटीत कोणी टाकले, याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. हे अर्भक दूरचे नसून, जवळील परिसरातीलच आहे, असेही पोलिसांनी सांगितले.