घरCORONA UPDATEकोरोनाच्या भीतीने कब्रस्तानने नाकारले; हिंदूंनी दिली दफन करण्यास जागा

कोरोनाच्या भीतीने कब्रस्तानने नाकारले; हिंदूंनी दिली दफन करण्यास जागा

Subscribe

कोरोना व्हायरसने माणसा माणसातील अंतर वाढवले असले तरी या संकटाच्या काळात माणुसकीचे दर्शनही होत आहे. तेलंगण राज्यात हैदराबाद येथे एक मुस्लिम व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर मृत व्यक्तिचे कुटुंबिय दफनविधी पार पाडण्यासाठी कब्रस्तानमध्ये गेले मात्र हा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याची शंका व्यक्त करत त्यांना जागा नाकारण्यात आली. त्यानंतर कुटुंबिय एकामागून एक अशा सहा कब्रस्तानमध्ये गेले. कुणीही त्यांना जागा दिली नाही. शेवटी दोन हिंदू मुलांनी आपल्या जमिनीत त्या मुस्लिम व्यक्तीचा दफनविधी करण्यास परवानगी दिली.

तेलंगणच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील गंडमगुडा परिसरात राहणारे मोहम्मद खाजा मियाँ (५५) येथे दहा वर्षांपूर्वी राहायला आले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबिय त्यांचे पार्थिव घेऊन जवळच्या कब्रस्तानमध्ये गेले. मात्र तेथील लोकांनी त्यांना पळवून लावले. त्यानंतर त्यांनी सहा कब्रस्तानला विनवणी केली. मात्र सर्वांनी त्यांना जागा देण्यास नकार दिला. हा मृत्यू कोरोनामुळे झालेला असू शकतो, त्यामुळे त्याचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून आम्ही जागा देऊ शकत नाही, असा त्यांना निरोप देण्यात आला.

- Advertisement -

हे कुटुंबिय मुळचे इथले स्थानिक नसल्यामुळे त्यांच्या मदतीसाठी देखील कुणीही आले नाही. शेजारच्या नागरिकांनी देखील त्यांना मदत करण्यास नकार दिला. खाज यांचा मुलगा बाशा याने सांगितले की, आम्ही चिंताग्रस्त झालो होतो. माझ्या वडिलांना दफन करण्यास जागा मिळणार की नाही? इतपत प्रश्न निर्माण झाला होता. पण शेवटी संदीप आणि शेखर नावाच्या दोन हिंदू युवकांनी आमची मदत केली. त्यांनी माझ्या वडीलांचे पार्थिव दफन करण्यास त्यांच्या जमिनीवरील जागा देऊ केली.

आता हे प्रकरण तेलंगणा राज्याच्या वक्फ बोर्डाकडे गेले आहे. कुटुंबियांनी बोर्डाचे अध्यक्ष मोहम्मद सलीम यांना निवेदन देत ज्या लोकांनी दफन करण्यास जागा दिली नाही, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -