घरदेश-विदेशशबरीमाला मंदिर महिलांसाठी खुले; सुप्रीम कोर्टाचा आणखी एक मास्टरस्ट्रोक

शबरीमाला मंदिर महिलांसाठी खुले; सुप्रीम कोर्टाचा आणखी एक मास्टरस्ट्रोक

Subscribe

महिलांना मंदिर प्रवेश नाकारुन असमानतेची वागणूक देणाऱ्या शबरीमाला मंदिर प्रशासनाला सुप्रीम कोर्टाने आज चांगलाच झटका दिला आहे. कायद्यासमोर सर्व भारतीय समान आहेत, याचा पुन्हा एकदा प्रत्यय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश दिला जावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा दिला जात होता. आज त्या लढ्याला यश प्राप्त झाले आहे. सुप्रीम कोर्टाने शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश रोखता येणार नाही, मंदिरात महिलांना दर्शन घेण्याचा अधिकार असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सांगितले. की, पुजाअर्चा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. शबरीमाला मंदिराची परंपरा हा धर्माचा भाग मानला जाणार नाही. अय्यप्पा मंदिरात पुजा करण्याचा महिलांनाही मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे शबरीमाला मंदिराची शेकडो वर्षांपासूनची परंपरेला घटनाबाह्य ठरवत सुप्रीम कोर्टाने शबरीमाला मंदिराचे दरवाजे सर्व वयोगटातील महिलांसाठी खुले केले आहेत.

प्रकरणाची पार्श्वभूमी

केरळच्या शबरीमाला मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेशास आतापर्यंत बंदी होती. याविरोधात २००६ साली इंडियन यंग लॉयर्स असोशिएशने आणि इतरांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ही प्रथा लैंगिक भेदभावावर आधारित असून ती बंद करण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. तर दुसऱ्या बाजुला मंदिर प्रशासनाने याचिकेचा विरोध केला होता. ही परंपरा शेकडो वर्षांपासूनची जुनी आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने यात दखल देऊ नये, अशी त्यांची भूमिका होती. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, रोहिंटन नरीमन, ए. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि इंदु मल्होत्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी १ ऑगस्ट २०१८ रोजी झाली आणि त्याचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज सुप्रीम कोर्टाने या निकालाचे वाचन करुन यावर शिक्कामोर्तब केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -