जागतिक सर्वे म्हणतोय, भारतीयांना आवडतंय Work From Home; तुमचं काय म्हणणंय?

work from home

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तेव्हापासून आजतागायत कोरोनानं जगातल्या कोणत्याच देशाला सोडलेलं नाही. जगभर पसरलेल्या कोरोनानं भारतालाही आपल्या विळख्यात घेतलं असून जगभरात दुसऱ्या क्रमांकाचे कोरोना रुग्ण भारतात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाऊन लागू केल्यानंतर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना Work From Home चे पर्याय उपलब्ध करून दिले. यामध्ये आयटी क्षेत्रातल्या कंपन्यांचा मोठा सहभाग होता. गेल्या २ महिन्यांपासून भारतात Unlock चे विविध टप्पे सुरू असून त्याअंतर्गत लॉकडाऊन देखील टप्प्याटप्प्याने उठवला जात आहे. मात्र, अजूनही अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच करायला सांगितलं आहे. त्यातच आता जागतिक पातळीवर झालेल्या एका सर्वेमध्ये भारतीयांना वर्क फ्रॉम होमच आवडत असल्याचं निदर्शनास आलं आहे! जागरणनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

सर्विस नाऊ या आंतरराष्ट्रीय कंपनीने…

यासंदर्भातला सर्वे केला आहे. यामध्ये भारत, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, नेदरलँड, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड अशा एकूण ११ देशांमध्ये हा सर्वे करण्यात आला. या देशांमधल्या ५०० हून अधिक कंपन्यांच्या सुमारे ८ हजार १०० कार्यालयांमधल्या कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. कर्मचाऱ्यांसोबतच या कंपन्यांमधल्या ९०० हून अधिक अधिकाऱ्यांनी देखील सर्वेमध्ये सहभाग घेतला होता.

सर्वेमध्ये आलेल्या निष्कर्षांनुसार…

भारतातील एकूण ५२ टक्के कर्मचारी आणि ६४ टक्के अधिकाऱ्यांना Work From Home करणं जास्त पसंत आहे. यासाठी संबंधित कंपन्यांनी त्यानुसार पुढील काळातली धोरणं बदल्याच्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची एकूण सरासरी टक्केवारी पाहिली असता एकूण ७४ टक्के भारतीय वर्क फ्रॉम होमला पसंती देत आहेत. अमेरिकेत ही टक्केवारी ८९ टक्के, ब्रिटनमध्ये ९८ टक्के आणि ऑस्ट्रेलियामध्ये हा आकडा ९८ टक्के इतका आहे.