जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यंदा बिहारमधील बेगूसरायहून भाकपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवतो असून तो अभिनेत्री स्वरा भास्करचा चांगला मित्र आहे. त्यामुळे आपला ३१वा वाढदिवस कन्हैयासाठी प्रचार करून साजरा करण्याचे स्वराने ठरवले. स्वरासोबत तिचे जवळचे मित्रही बेगूसरायमध्ये दाखल झाले. तसेच भाकपचा प्रचार करण्यासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे स्टुडंट युनियनचे विद्यार्थी नेतेही बेगूसरायमध्ये पोहोचले.
‘मला पार्टी करायला खूप आवडत असले तरी यावर्षी दिवसभर फिरून मी माझा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे मला नेहमीसारखी पार्टी करता आली नाही. म्हणून दिवसभराचा प्रचार संपल्यावर मी माझ्या जवळच्या मित्रांसोबत मी पार्टी केली’ अशी माहिती स्वराने दिली आहे.
यावेळी सभेचे आयोजनही करण्यात आले होते.उमेदवार कन्हैया कुमारने यावेळी मोदी सरकारवर निशाण साधला. धर्माधर्मांत तेढ निर्माण करून लोकांना लढवणारा नेता नव्हे तर त्यांच्या मुलांसाठी हॉस्पिटल देणार्या नेत्यावर जनतेचा विश्वास आहे,असे कन्हैया कुमार म्हणाला.तसेच मी बेगुसराय मतदार संघातून उभा असल्याने मोदींना मी घाबरत नसल्याचे म्हणत कन्हैयाने सरकारच्या धोरणांवर यावेळी सडकून टीका केली.
कन्हैय्या कुमारचा अर्ज दाखल
कन्हैय्या कुमारने मंगळवारी बेगुसरायमध्ये निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याने फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. अर्ज दाखल केल्यानंतर त्याने प्रचारसभेलाही संबोधित केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाडही यावेळी उपस्थित होते. भाजपकडून केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह बेगूसरायमधून निवडणूक लढवत आहेत.