अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी उद्धव ठाकरेंच्या दौर्‍याची तयारी पूर्ण

uddav thakre

अयोध्येतील राम मंदिराचा शिलान्यास हा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्याच्या तिथल्या विश्वस्तांच्या मागणीच्या पूर्ततेसाठी उध्दव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याची नुकतीच आखणी करण्यात आली आहे. या आखणीच्या निमित्ताने सेनेचे खासदार संजय राऊत नुकतेच अयोध्येत जाऊन आले. राऊत यांनी राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्यासह अनेक संतांच्या भेटी घेतल्या. या भेटीत उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येतील दौर्‍याचे नियोजन करण्यात आले.

या दौर्‍यात उद्धव ठाकरे रामजन्मभूमीचे दर्शन घेऊन राम मंदिर निर्माणासाठी सभाही घेणार आहेत. येणार्‍या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे अयोध्या दौर्‍याची तारीख जाहीर करणार आहेत. या अगोदर उद्धव ठाकरे यांनी ‘चलो अयोध्या’चा नारा देत रामजन्मभूमी मंदिर निर्माण न्यासाचे अध्यक्ष जन्मेजयशरणजी महाराज यांचे आमंत्रण शिवसेना भवनात स्वीकारले होते. दसर्‍यानंतर राम मंदिराची वीट रचण्याचा मनोदय जन्मेजय यांनी व्यक्त केला होता.

राम मंदिर उभारणीसाठी शिवसेना आजवर आग्रही आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सुरक्षेच्या दृष्टीने अयोध्येत जाणे शक्य झाले नाही. आता उध्दव ठाकरे यांनी ही जबाबदारी घेतल्याने याचा शिवसेनेला देशभर फायदा मिळू शकतो, असे जाणकार सांगतात.