घरदेश-विदेशमध्य प्रदेशात अटीतटीची लढाई

मध्य प्रदेशात अटीतटीची लढाई

Subscribe

मध्य प्रदेशातील विधान सभा निवडणुकीत अटीतटीची लढाई झाली. रात्री उशीरापर्यंत निकाल जाहीर नव्हते. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष बहुमताच्या आसपास घुटमळत होते. कधी एक-दोन जागांनी भाजप पुढे तर कधी काँग्रेस. हे रात्री उशीरापर्यंत सुरू होते. मात्र कोणालाही बहुमत मिळालेले नव्हते.

मध्यप्रदेशात गेली 15 वर्षे भाजपची सत्ता होती. या ठिकाणी भाजपचे शिवराजसिंग चौहान मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्त्व करत होते. शिवराजसिंग चौहान यांची प्रतिमा जनमानसात चांगली होती. जनताउपयोगी योजना, उपक्रम, प्रकल्प आणून त्यांनी मध्यप्रदेशमधील जनतेच्या मनात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. त्यामुळे २०१४च्या निवडणुकांमध्ये देशभरात मोदी लाट होती, मात्र मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहान यांचा गवगवा होता. त्यांच्या कल्याणकारी योजनांविषयी जनता कमालीची सकारात्मक होती, मात्र असे असले तरी मध्य प्रदेशातील शेतकर्‍यांची नाराज शिवराजसिंग चौहान यांना दूर करता आली नाही. कारण मध्य प्रदेशाचा ७० टक्क्यांहून अधिक भाग शेतकर्‍यांचा आहे.

- Advertisement -

या ठिकाणी शेतकर्‍यांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या विरोधात संताप वाढत गेला, मात्र शिवराजसिंग चौहान शहरी भागाच्या विकासाकडे लक्ष केंद्रीत करू लागले. त्यामुळे राज्याच कृषीक्षेेत्राची पडझड झाली, तब्बल २ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. मंदसोर येथे शेतकरी आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात 5 शेतकर्‍यांचा बळी गेला. अशा प्रकारे शेतकर्‍यांच्या नाराजीचा थेट फटका या विधानसभा निवडणुकीत भाजपला झाला आहे.

दुसरीकडे मध्य प्रदेशातील काँग्रेसमध्ये गटबाजीने जी पाळेमुळे रावली होती, ती शेवटपर्यंत घट्ट राहिली. या ठिकाणी कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंदीया, दिग्वीजय सिंग या तीन नेत्यांची तोंड विरुद्ध दिशेनेच राहिली. त्यामुळे प्रचारात काँग्रेसला त्याचे परिणाम भोगावे लागले. ज्या प्रमाणात मध्य प्रदेशात भाजपच्या विरोधात वातावरण होते, त्याचे मतपेटीत रुपांतर करून काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळवून चांगली आघाडी घेणे अपेक्षित होते, मात्र केवळ गटबाजीमुळे काँग्रेसच्या विजयाची रेषा मध्येच खुंटली आणि बहुमताच्या काठावर येऊन थांबली. सुदैवाने या ठिकाणी बसपने एक आकडी तरी जागा जिंकून आणल्या. आता बसपच्या भूमिकेवर काँग्रेसचे भवितव्य ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -