सैन्य माघारीवरुन केलेल्या ‘त्या’ ट्विटवरुन काँग्रेसने पंतप्रधान मोदींना घेरलं

२०१३ मध्ये केलं होतं ट्विट

New Delhi
pm modi

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर आणि रणदीप सुरजेवाला यांनी २०१३ च्या ट्विटचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. २०१३ मध्ये भारत-चीन तणावाशी संबंधित हे ट्विट गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी केलं होतं. हे ट्विट रिट्विट करत दोन्ही कॉंग्रेसने पंतप्रधानांना जाब विचारला आहे.

२०१३ च्या ट्विटमध्ये, यूपीए-२ च्या काळात नरेंद्र मोदींनी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारला विचारलं होतं की लडाखमधील भारतीय सैन्य आपल्याच क्षेत्रातून का मागे हटत आहे. ट्विटमध्ये नरेंद्र मोदींनी लिहिलं होतं की, “चीन आपलं सैन्य मागे घेत आहे. पण मला आश्चर्य वाटतं की भारतीय सैन्य स्वतःच्या भूमीवरुन मागे का हटत आहे? आपण का माघार घ्यावी?” या ट्विटवरुन आता काँग्रेसने मोदींना सवाल केला आहे. हे ट्वीट प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव असताना केलं होतं. दोन्ही पक्षांनी तणाव कमी करण्याचं मान्य केलं आणि लडाखच्या वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेतलं जावं यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली. १५ एप्रिल २०१३ रोजी चीनच्या सैन्याने १० किलोमीटर भारतीय हद्दीत प्रवेश करून लडाखच्या डेपसांग खोऱ्यामध्ये तळ ठोकला होता, असं भारताने त्यावेळी म्हटले होतं.

दरम्यान, १५ जूनला भारत-चीन सैन्यांत हिंसक चकमक झाली होती. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते. या घटनेवरून कॉंग्रेसने सुरुवातीपासूनच सरकारला घेराव घातला आहे. मंगळवारी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी नरेंद्र मोदी यांच्या २०१३ च्या ट्विटला रिट्विट करत म्हटलं आहे की, “मी या प्रकरणात मोदीजींच्या बाजूने आहे (सैन्य माघार घेण्यावरुन). यावर पंतप्रधानांनी उत्तर द्यावे.” पक्षाचे नेते रणदीप सुरजेवाला यांनीही एक ट्विट केलं. “आदरणीय पंतप्रधान, तुम्हाला तुमचे शब्द आठवतात का? तुमचे शब्दांना महत्व आहे का? आम्हाला सांगाल का, आमचं सैन्य आपल्या भूमीपासून का मागे हटत आहे? देश उत्तर मागतोय.”


हेही वाचा – फडणवीसांना कोरोनाची भीती नाही, मग मुख्यमंत्री घरी का? – चंद्रकांत पाटील