घरदेश-विदेशदहशतवाद्यांचा भ्याड हल्ला

दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला

Subscribe

उरीपेक्षाही मोठा धक्का,जैश-ए-मोहम्मदने स्फोटके भरलेले वाहन घुसवून केला स्फोट

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी दुपारी केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) 4० जवान शहीद झाले, तर २० जवान गंभीर जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. जैशच्या दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने सीआरपीएफच्या जवानांच्या बसला जोरदार धडक दिली. त्यावेळी स्फोट होऊन घटनास्थळी रक्तमांसाचा सडा पडला. अलीकडच्या काळात काश्मीरमध्ये झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. उरी हल्ल्यात १७ जवान शहीद झाले होते. हा हल्ला उरी हल्ल्यापेक्षाही मोठा आहे.

सीआरपीएफचे २,५०० पेक्षा जास्त जवान सुट्टी संपवून काश्मीर खोर्‍यात ड्युटीवर परतत होते. हे सर्व ७८ वाहनांच्या ताफ्यातून प्रवास करत होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. ही घटना श्रीनगर-जम्मू हायवेवरील लाटूमोडमध्ये अवंतीपुरा भागात घडली.स्फोटक भरलेले वाहन आत्मघाती दहशतवादी अदील मोहम्मद नावाचा दहशतवादी चालवत होता. तो पुलवामा जिल्ह्यातील कोकरापारा येथील रहिवाशी आहे. २०१८ मध्ये तो ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. ज्या बसला दहशतवाद्यांच्या वाहनाने धडक दिली होती त्या बसचा केवळ लोखंडी सांगाडा उरला आहे. या हल्ल्यात इतरही काही बसेसचे नुकसान झाले.

- Advertisement -

२,५०० जवानांच्या ताफ्यावर गोळीबारही करण्यात आला, असे सीआरपीएफचे महासंचालक आर. आर. भटनागर यांनी सांगितले. पहाटे ३.३० वाजता निघालेल्या या वाहनांच्या ताफ्याला सूर्यास्तापूर्वी श्रीनगरला पोहचायचे होते, असे एका अधिकार्‍याने सांगितले.

पुलवाम्यात पोलिसांनी नाकाबंदी केली असून पूर्ण परिसराला घेरले आहे. तसेच दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सीआरपीएफचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 2004 नंतर ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवाद्यांनी हा मोठा हल्ला घडवला आहे. उरीपेक्षाही हा भारतावरचा सर्वात मोठा हल्ला असल्याचं मानलं जात आहे.

- Advertisement -

हे आहेत मोठे दहशतवादी हल्ले
*२९ नोव्हेंबर २०१६ -जम्मू शहराच्या बाहेर असलेल्या नागरोटा स्थित १६ कॉपर्सच्या मुख्यालयातील १६६ आर्मी युनिटच्या परिसरात दहशतवादी शिरले. या हल्ल्यात ७ जवान शहीद. त्यात २ अधिकार्‍यांचा समावेश.

*१८ सप्टेंबर २०१६ -बारामुल्ला जिल्ह्यातील उरी भागात असलेल्या भारतीय लष्कराच्या कॅम्पवर पहाटे ४ वाजता दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले. भारतीय लष्कराने हल्ला करणार्‍या चार दहशतवाद्यांना ठार मारले. (या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला.)

*२५ जून २०१६ – श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील पाम्पोरजवळ दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या वाहन ताफ्यावर हल्ला केला. त्यात सीआरपीएफचे ८ जवान शहीद झाले. तर २० जखमी झाले.

*२१ फेब्रुवारी २०१६ – सरकारी इमारतीत शिरलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या जवानांवर केलेल्या गोळीबारात तीन आर्मी कमांडो शहीद झाले.

*१-२ जानेवारी २०१६ – पंजाबमधील पठाणकोट येथील भारतीय वायू सेनेच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला. वायू सेनेचे तीन जवान शहीद

पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करा
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी १८ सप्टेंबर २०१६ रोजी पहाटे नियंत्रण रेषेलगत उरी भागात असलेल्या भारतीय लष्कराच्या कॅम्पवर हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे १७ जवान शहीद झाले. या हल्ल्यामुळे देशातील जनमत प्रक्षुब्ध झाले होते. पाकिस्तानला धडा शिकण्याची मागणी देशभरातून होत होती. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ११ दिवसांनी म्हणजे २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्करातील पॅरा कमांडोंनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये मोठा सर्जिकल स्ट्राईक केला. त्यात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करत शेकडो दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या भूमीतच ठार मारण्यात आले. असाच सर्जिकल स्ट्राईक पुन्हा करण्यात यावा, अशी मागणी आता देशभरातून होत आहे. विशेष म्हणजे या सर्जिकल स्ट्राईकवर, ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपटही निघाला.

मोदी, अजित डोवाल यांची बैठक
पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संध्याकाळी सातच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत हल्ल्याची माहिती पंतप्रधानांनी घेतली तसेच सुरक्षेचाही आढावा घेतला. या बैठकीनंतर डोवाल यांनी संबंधितांची बैठक बोलावली होती.

* सीआरपीएफच्या वाहनावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद.
* अदील अहमद हा पुलवामा काकापोरातील दहशतवादी हल्ल्यात ठार.
* सीआरपीएफच्या वाहनांच्या ताफ्यावर स्फोटके भरलेली कार आदळून हल्ला.
* ७८ पेक्षा जास्त वाहनांचा ताफा सुमारे २५०० जणांना घेऊन जम्मूहून श्रीनगरला जात होता.
* हा ताफा पहाटे ३.३० वाजता निघाला होता, तो श्रीनगरला सुर्यास्तापूर्वी पोहचणार होता.
* बर्फवृष्टी होत असल्यामुळे हायवे बंद होता. गुरुवारी खुला करण्यात आला होता.
* केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची सीआरपीएफचे महासंचालक आर.आर. भटनागरांशी चर्चा.
* उच्चस्तरीय चौकशीचे आदेश.

गाडीत ३५० किलो स्फोटक
सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात दहशतवाद्यांनी स्कॉर्पिओ एसयुव्ही गाडीचा वापर केला. या गाडीत तब्बल ३५० किलो वजनाची स्फोटके भरलेली होती. इतक्या स्फोटकांसह ही गाडी सीआरपीएफच्या ताफ्यातील बसवर जाऊन आदळली. ही गाडी सुसाइड बॉम्बर आदिल अहमद दार चालवत होता.

जैश-ए-मोहम्मद कोण?
जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना मार्च, २००० मध्ये स्थापन करण्यात आली. कंधार विमान अपहरणामध्ये ज्याची सुटका झाली तो मसूद अजहर याने ही संघटना काश्मीरला भारतातून वेगळे करण्यासाठी स्थापन केली.

सांगलीतील राहुल कारंडे शहीद

दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील एक वीरजवान शहीद झाला आहे. सांगलीतील विठूवाडी येथे रहाणारे राहुल बजरंग कारंडे यांना या दहशतवादी हल्ल्यात वीर मरण आले. त्यामुळे विठूवाडीवर शोककळा पसरली होती.

जैशने जारी केला सुसाइड बॉम्बरचा व्हिडिओ
कारमधून आत्मघाती हल्ला करणारा जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा एक स्थानिक दहशतवादी असल्याचे उघड झाले आहे. हा हल्ला अदील अहमद याने केला आहे. त्याचा एक व्हिडिओ रिलिज झाला आहे. त्या व्हिडिओत अदील म्हणतो, मी गेल्यावर्षीच जैश-ए-मोहम्मद या संघटनेत दाखल झालो आहे. मला वर्षभरानंतरच या हल्ल्याची मोहीम देण्यात आली. जेव्हा हा व्हिडिओ रिलीज होईल तेव्हा मी जन्नतमध्ये असेन असे अदीलने व्हिडिओत म्हटले आहे. जैशच्या बॅनरसमोर उभा राहून हातात रायफल घेतलेल्या पोझमध्ये आदिलने हे व्हिडिओ शूट केले आहे.

सीआरपीएफच्या जवानांवर पुलवामा येथे झालेला हल्ला घृणास्पद आहे. मी या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. आपल्या शूर जवानांचे बलिदान व्यर्थ न जावो. संपूर्ण देश खांद्याला खांदा लावून शूर शहीदांच्या कुटुंबीयांसोबत आहे. जखमींना लवकरच आराम मिळो.-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

जम्मू आणि काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे मी खूप विचलित झालो आहे. त्यात आपले अनेक शूर सीआरपीएफ जवान शहीद झाले आहेत. अनेक जखमी आहेत. त्यापैकी काही गंभीर आहेत. मी शहीदांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.-राहुल गांधी, अध्यक्ष, काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -