२०२४ साली निवडणुका होणार नाहीत, भाजप खासदाराचे भाकीत

New Delhi
BJP MP Sakshi Maharaj
भाजपचे खासदार साक्षी महाराज

देशात सध्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला असून प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या कामाला लागला आहे. सर्वांनाच २०१९ साली काय होईल? याची चिंता आहे. मात्र भाजपचे खासदार साक्षी महाराज यांना २०१९ सोडाच मात्र पुढच्या निवडणुकांची चिंताही नाही. आज उन्नाव येथे भाषण करताना ते म्हणाले की, “देशात सध्या मोदींची सुनामी आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकानंतर पुन्हा निवडणूक होणार नाही.”

साक्षी महाराज हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. गुरुवारी उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे भाषण करत असताना ते म्हणाले की, “मोदींची सुनामी देशात आहे. देशात आता जागृती झाली आहे. मला वाटतं या निवडणुकीनंतर २०२४ साली निवडणुका होणार नाहीत. फक्त हीच निवडणूक आहे, त्यामुळे लोकांनी उमेदवारांना जिंकवण्याचे काम करावे.”

११ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात होत आहे. तर २३ मे रोजी निवडणुकांचा निकाल येईल. त्यादिवशी देशाचा पंतप्रधान कोण असेल? हे देशाला कळेल. मध्यतंरी साक्षी महाराज यांनी भाजपच्या वरिष्ठांनाच पत्र लिहून धमकी दिली होती. जर मला तिकीट मिळाले नाही, तर पक्षाला वाईट परिणाम भोगावे लागतील, असे साक्षी महाराज म्हणाले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here