चोरीनंतर चोरानं ठेवली चिठ्ठी; वाचून तुम्हीही म्हणाल, मार दिया जाय या छोड दिया जाय!

letter
प्रातिनिधीक छायाचित्र

कोरोनाचा काळ सुरू आहे. तसाच तो लॉकडाऊन आणि आर्थिक तंगीचा देखील सुरू आहे. अनेकांना या काळात आपले रोजगार गमवावे लागले आहेत. अनेकांच्या पगारांमध्ये कपात झाली आहे. अनेक छोटे आणि मध्यम उद्योगधंदे बंद देखील पडले आहेत. त्यामुळे प्रत्येकालाच आर्थिक समस्येचा सामना करावा लागत असताना चोरांची गत काय झाली असेल, हा एक प्रश्न रंजक ठरू शकतो. चोरांनाही आर्थिक फटका बसत असेल का? या प्रश्नाचं उत्तर खुद्द एका चोरानंच दिलं आहे. आणि हे उत्तर त्यानं चक्क एक चोरी केल्यानंतर तिथेच मालकासाठी ठेवलेल्या चिठ्ठीतून दिलं आहे. या चोराची ही चिठ्ठी वाचून खरंतर तुम्हीही बुचकळ्यात पडाल की नक्की या चोराला काय म्हणावं. त्याच्या चिठ्ठीमध्ये चोरानं चक्क आपल्या गुन्ह्याची कबुली देतानाच मालकाची माफीही मागितली आहे. त्यापुढे त्यानं असं एक गणित मांडलंय, जे वाचून कदाचित मालकानंच चोराला खिशातले पैसे द्यायचा विचार केला असेल!

तर त्याचं झालं असं की…

तामिळनाडूच्या उसिलमपट्टी-मदुरई महामार्गावर एक शॉपिंग मार्ट आहे. ३० वर्षीय एम. रामप्रकाश त्याचे मालक आहेत. बुधवारी नेहमीप्रमाणे ते आपलं दुकान बंद करून घरी गेले. गुरुवारी सकाळी जेव्हा ते पुन्हा दुकान उघडण्यासाठी आले, तेव्हा त्यांना समोर वेगळंच चित्र दिसलं. त्यांच्या दुकानातलं सामान अस्ताव्यस्त झालं होतं. पण त्यातून दोन कम्प्युटर, एक टीव्ही आणि ५ हजार रुपयांची रोकड असा सुमारे ६५ हजार रुपयांचा ऐवज गायब आहे! इतर कुणीही केलं असतं, तेच त्यांनीही केलं. पोलिसांना पाचारण केलं. पण याचदरम्यान, त्यांच्या हाती खुद्द चोरानंच त्यांच्या नावे लिहिलेली एक चिठ्ठी लागली.

चिठ्ठी वाचून मालकच बुचकळ्यात!

आपल्या दुकानात चोरी करून चोरानं आपल्याच नावे अशी अजब चिठ्ठी लिहून ठेवल्यामुळे मालक बुचकळ्यात पडला. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, ‘मी तुमची माफी मागतो. मला भूक लागली आहे. या चोरीमुळे तुमचं फक्त एका दिवसाच्या कमाईचं नुकसान झालं आहे. पण ती माझी ३ महिन्यांची कमाई आहे. मी पुन्हा एकदा तुमची माफी मागतो’!

दरम्यान, चोरानं दुकानातलं CCTV फूटेज देखील गायब केलं आहे. त्यामुळे त्याची ओळख तपासण्यासाठी पोलिसांनी फिंगरप्रिंट्स एक्स्पर्ट्सची मदत घेतली आहे. तसेच, पोलिसांनी देखील या प्रकरणात गुन्हा दाखल करून कसून तपास सुरू केला आहे. मात्र, चोराची चिठ्ठी वाचून त्याच्यावर कारवाई करावी की त्याला सोडून द्यावं, असा प्रश्न खुद्द पोलिसांच्या मनात देखील निर्माण झालाच असेल.