भारतात तीन कोरोना लसी ‘क्लिनिकल ट्रायल’च्या टप्प्यात; ICMR ने दिली माहिती

कॅडिला आणि भारत बायोटेक यांनी पहिल्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहेत. तर सिरम इन्स्टिट्युटने फेज २ B3 चाचणी पूर्ण केली आहे.

जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक जगातील शास्त्रज्ञांचे कोरोना व्हायरसवरील प्रतिबंध करणाऱ्या लसींवर काम सुरु आहे. जगातल्या विविध देशांमध्ये ही प्रक्रिया सुरु असून भारत देशही यामध्ये पुढे आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी भारतात तीन लसी या क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात असल्याची माहिती दिली आहे.

यावेळी त्यांनी असे सांगितले की, कॅडिला आणि भारत बायोटेक यांनी पहिल्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहेत. तर सिरम इन्स्टिट्युटने फेज २ B3 चाचणी पूर्ण केली आहे. सिरमने तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु केली आहे.

यावेळी डॉ. बलराम भार्गव यांनी असे सांगितले की, अमेरिका आणि युरोपातल्या काही देशांमध्ये कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर आली होती. त्यानंतर ती हळूहळू कमी झाली होती. त्यानंतर तिथे दुसरी कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली. आपण यातून शिकलं पाहिजे. आपण पहिल्याच लाटेच्या वेळी लॉकडाउनची अमलबजावणी कठोर पद्धतीने केली. नाहीतर आपणही सांगू शकलो नसतो की कोरोनामुळे किती मृत्यू होतील. तसेच, आपण चांगल्या उपाय योजना केल्याने आपल्याकडे इतर देशांच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणावर हा संसर्ग पसरला नाही, असेही ते म्हटले.

दरम्यान, देशातील कोरोनाबाधित संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या २४ तासांत देशात ८३ हजार ८०९ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून १ हजार ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४९ लाख ३० हजार २३७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८० हजार ७७६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३८ लाख ५९ हजार ४०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ९ लाख ९० हजार ६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रायलयाने दिली आहे.


चिंताजनक! महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे बळी; केंद्राची आकडेवारी जारी