सर्वात वेगवान ‘ट्रेन १८’ चे तिकीट दर, खिसा रिकामा करणारे

'ट्रेन १८' ही भारतातील पहिली इंजिनविरहित आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीची ट्रेन आहे

Mumbai
Ticket rates of India's Fastest Train 18

‘ट्रेन १८’ या सुपरफास्ट ट्रेनला ‘देशातील सर्वात वेगवान ट्रेन’ असा बहुमान प्राप्त झाला आहे. गेल्याचवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये या ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. दरम्यान, देशातील या सर्वात जलद ट्रेनमधूनजर तुम्हाला प्रवास करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमचं पाकीट रिकामं करावं लागणार आहे. ‘ट्र्रेन-18’ च्या तिकीटाचे दर जाहीर झाले असून, तिकीटांचे दर हजाराच्या घरात आहेत. या ट्रेनमधून दिल्ली ते वाराणसी असा प्रवास एसी चेअरकारमधून करायचा झाल्यास प्रवाशांना त्यासाठी  १,८५० रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक्झिक्युटिव्ह क्लासच्या तिकीटाचा दर ३,५२० इतका निश्चित करण्यात आला. या दरामध्येे जेवणाची रक्कम सामाविष्ट करण्यात आली आहे. दुसरीकडे वाराणसी ते दिल्ली या परतीच्या प्रवासासाठी एसी चेअर कारचं तिकीट १,७९५ रुपये असणार आहे. तर, एक्झिक्युटिव्ह क्लासचं तिकीट ३,४७० रुपये इतकं असणार आहे.

सूत्रांनुसार,  ‘शताब्दी’ एक्सप्रेसच्या तिकीट दरांशी याची तुलना केली तर, ‘ट्रेन-18’ च्या चेअरकारचं तिकीट हे दीडपट आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचं तिकीट हे १.४ पटीने जास्त आहे.

‘ट्रेन १८’ ची रचना थोडक्यात

एकूण १६ डब्ब्यांच्या या ट्रेनमधील १४ डबे हे ‘नॉन एक्झिक्युटिव्ह’ आणि २ डबे ‘एक्झिक्युटिव्ह’ असतील. सुरुवातीच्या टप्प्यात अशा नऊ रेल्वेगाड्या देशभरातील विविध मार्गांवर धावतील. याचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे ‘एक्झिक्युटिव्ह’ क्लासमधील आसनव्यवस्था फिरती असून, गाडी ज्या दिशेने जात आहे त्या दिशेने तुमची सीट तुम्हाला फिरवता येईल. याशिवाय ट्रेनच्या प्रत्येक डब्यामध्ये स्वयंचलित दरवाजे, स्लायडिंग फूटस्टेप्स, हाय स्पीड फ्री वायफाय, इन्फोटेनमेंट, सीसीटीव्ही, झिरो डिस्चार्ज बायो व्हॅक्युम शौचालयं, जीपीएस प्रणालीद्वारे प्रत्येक प्रवाशाची माहिती आदी अत्याधुनिक फीचर्सचा समावेश असणार आहे.

‘ट्रेन १८’ ही भारतातील पहिली इंजिनविरहित आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीची ट्रेन असून, तिला ‘वंदे भारत एक्सप्रेस’ असंही  नाव देण्यात आलं आहे. सूत्रांनुसार, येत्या १५ फेब्रुवारीला या ट्रेनच्या दिल्ली ते वाराणसी अशा पहिल्या फेरीला पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here