घरदेश-विदेश'काही मतांसाठी फाशीवर लटकवायचं आहे' - विजय माल्ल्या

‘काही मतांसाठी फाशीवर लटकवायचं आहे’ – विजय माल्ल्या

Subscribe

बँकांचं कर्ज फेडण्यास तयार असूनही निवडणूक जवळ आल्यामुळं मत मिळवण्यासाठी आपल्याला फाशीवर लटकवण्याचा अट्टाहास असल्याचं विजय माल्ल्यानं वक्तव्य केलं आहे.

भारतीय बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फरार झालेल्या विजय माल्ल्यानं खूप मोठं वक्तव्य केलं आहे. ‘भारतातील काही लोक मला जबरदस्ती फाशीवर लटकवत आहेत. मी कर्ज फेडायला तयार आहे. मात्र, जबरदस्तीनं माझी संपत्ती जप्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.’ असं वक्तव्य विजय माल्ल्यानं केलं आहे. ब्रिटन कोर्टानं दिलेल्या आदेशानं काहीही फरक पडणार नसून ब्रिटनमधील माल्ल्याच्या संपत्ती कुटुंबाच्या नावे असल्यामुळं या संपत्तीला कोणीही हात लावू शकणार नाही. तर, भारत शासन सध्या लंडनकडून माल्ल्याचं भारताला समर्पण होण्यासाठी संपूर्ण जोर लावत आहे आणि यासंदर्भात लंडनच्या कोर्टाकडून सप्टेंबरपर्यंत निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘मतांसाठी मला फाशी टांगायला निघाले आहेत’

रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये विजय माल्ल्यानं आरोप लावला आहे. ‘भारतामध्ये पुढच्या वर्षी निवडणूक आहे. त्यामुळं, मला फाशी देऊन, सरकारला निवडणुकीत जास्त मतं मिळतील. मी भारतात यायला तयार असून बँकांशी तडतोड करायला तयार आहे. तरीही मला पोस्टर बॉय बनवण्यात येत आहे.’ असा आरोप विजय माल्ल्यानं केला आहे. दरम्यान, ब्रिटीश उच्च न्यायालयानं भारतीय बँकांनी केलेल्या अर्जावर त्यांचा निर्णय दिला असून यामध्ये १३ बँका विजय माल्ल्याच्या संपत्तीसंदर्भात तपास आणि नियंत्रणासाठी पुढील तपास करू शकतात असं सांगण्यात आलं होतं.

- Advertisement -

ब्रिटनमधील संपत्ती माल्ल्याच्या नावे नाही

विजय माल्ल्यानं दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये त्याची कोणतीही संपत्ती नाही आणि जी काही संपत्ती आहे, ती सर्व त्याची आई आणि मुलांच्या नावे आहे. त्यामुळं या संपत्तीला कोणीही हात लावू शकत नाही. ब्रिटनमध्ये त्याच्या नावे काही कार्स आणि दागिने आहेत, जे कधीही बँकेला सोपवण्यास आपण तयार असल्याचं माल्ल्यानं स्पष्ट केलं आहे. इतकंच नाही तर, ब्रिटीश अधिकाऱ्यांना आपण योग्य प्रकारे चौकशीसाठी सहयोग देऊ असंही माल्ल्यानं सांगितलं आहे. ब्रिटनमधील ज्या घरात सध्या विजय माल्ल्या वास्तव्यास आहे तेदेखील आपल्या नावावर नसल्याचं त्यानं नमूद केलं आहे.

‘फरार झालो नाही, तर घरी आलो आहे.’

मार्च २०१६ मध्ये भारतातून फरार झाल्यानंतर विजय माल्ल्या ब्रिटनमध्ये राहात आहे. यासंदर्भात ‘मी इंग्लंडचा रहिवासी असून एनआरआय आहे. तर मी कुठे जाणार? त्यामुळं फरार आहे असं म्हणणंच चुकीचं आहे. यामागे राजकारण आहे.’ असं माल्ल्यानं यावेळी सांगितलं आहे. ‘तपास यंत्रणा सतत खोटं बोलत आहेत. मी आधीच माझी योजना पाठविली होती. मात्र त्याचं कोणतंही उत्तर आलं नाही. मला मुद्दाम फरार घोषित करण्यात येत आहे. मी तर भारतातदेखील यायला तयार आहे’ असंही माल्ल्यानं मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -