Gujarat Road Accident: ट्रक-कंटेनरमध्ये भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू, १७ जखमी

गुजरातमधील बडोद्यात ट्रक आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये १० लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १७ प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघातांचे सत्र सुरु असतानाच पुन्हा एकदा गुजरातमध्ये भीषण अपघात झाला आहे. गुजरातमधील बडोद्यात ट्रक आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १० लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १७ प्रवासी जखमी झाले आहेत. बडोद्यातील वाघोडीया क्रॉसिंग हायवेजवळ ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; ट्रक आणि कंटेनरमध्ये टक्कर झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. ही धडक ऐवढी भीषण होती की यामध्ये दहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १७ जण जखमी झाले असून जखमींना जवळील वडोदरा येथील एसएसजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, अद्याप अपघाताचे मुख्य कारण कळू शकलेले नाही.

अपघातामधील सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. एका लग्नसमारंभातून ते परत येत असताना हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दहा मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, पोलीस सध्या घटनास्थळी अपघाती वाहन बाजूला करुन प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहेत. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे. मृतदेहांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती देण्यात येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.


हेही वाचा – ‘या’ राज्यात शाळा सुरु होताच ८ शाळांमधील ८० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण