जाणून घ्या, कसे होते मनोहर पर्रिकर

भारतीय राजकारणात मनोहर पर्रिकर यांना स्वच्छ व्यक्तीमहत्व म्हणून ओळखले जाते. त्यांच्या याच व्यक्तीमत्वामुळे त्यांना २०१२ मध्ये सीएनएन-आयबीएनद्वारे पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले होते.

Mumbai
manohar parrikar
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (फाईट फोटो)

भारतीय राजकारणात मनोहर पर्रिकर यांचे नाव नेहमीच आदराने घेतलं जातं. पर्रिकरांबद्दल जनतेच्या मनात फार आदर आहे. आतापर्यंत तीन वेळा ते गोवा राज्याचे मुख्यमंत्री बनले. गेल्या काही दिवसांपासून पर्रिकरांची प्रकृती खालावली होती. त्यांना कॅन्सरचे निदान झाले. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. मध्यंतरी त्यांच्या प्रकृतीमध्ये जेव्हा सुधारणा झाली तेव्हा पर्रिकर गोव्याच्या अधिवेशनात दिसले होते. अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांना आराम करायचा सल्ला दिला होता. तरीही त्यांनी अधिवेशनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. देशाप्रती त्यांच्या मनात अत्यंत आदर आणि कळकळ होती.

मनोहर पर्रिकर यांचा जन्म

मनोहर पर्रिकर यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ रोजी गोव्याच्या म्हापशा गावात झाला होता. गोव्याच्या लोयोला हायस्कूल या शाळेत त्यांनी आपले शिक्षण घेतले. गोव्यात त्यांनी १२ वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत दाखल झाले. मुंबईच्या आयआयटी येथे त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले मुंबईमध्ये शिक्षण घेतल्यामुळे हिंदी आणि इंग्रजीसोबतच मराठी भाषाही त्यांना ज्ञात होती.

मनोहर पर्रिकर यांचा राजकीय प्रवास

मनोहर पर्रिकर आपल्या शालेय जीवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (आरएसएस) सामील झाले होते. शिक्षणासोबतच त्यांनी आरएसएसच्या युवा शाखेसाठी कामे करायला सुरुवात केली. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुन्हा आरएसएससोबत काम करण्याचे ठरवले. आरएसएसच्यामार्फत ते पुढे भाजप पक्षासोबत जोडले गेले. त्यानंतर १९९४ मध्ये भाजपने पहिल्यांदा त्यांना गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी संधी दिली. या निवडणुकीत मनोहर पर्रिकर यांना यश आले होते. परंतु, भाजपला या निवडणुकीत गोव्यामध्ये फार काही यश आले नव्हते. यावेळी त्यांनी गोवा विधानसभामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका निभावली होती. यानंतर गोव्यामध्ये भाजपचे ‘अच्छे दिन’ सुरु झाले. गोव्यात भाजपचे साम्राज्य वाढण्यामागे पर्रिकर यांचे मोठे योगदान आहे. त्यातूनच २००० साली भाजपला गोवा विधानसभा निवडणुकीत भरघोस यश आले. यावेळी भाजप सत्तेत आले आणि मनोहर पर्रिकर भाजपचे नवे मुख्यमंत्री बनले. दरम्यान, या कालावधीत त्यांचे कौटुंबिक जीवनात बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यांच्या पत्नी मेधा पर्रिकर कॅन्सरग्रस्त होत्या आणि या रोगामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही मुलांची संपूर्ण जबाबदारी पर्रिकर यांच्यावर पडली. यात काही घाडमोडी अशा घडल्या की, २७ फेब्रुवारी २०१७ रोजी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पुन्हा ५ फेब्रुवारी २००२ रोजी त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली गेली. २००५ साली भाजपला गोव्यात अपयश आले आणि पर्रिकर यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले.

२०१२ मध्ये पुन्हा मुख्यमंत्री

२०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला गोव्यात पुन्हा यश आले आणि मनोहर पर्रिकर पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले. २०१४ साली भाजपला देशात सर्वाधिक बहुमत मिळाले आणि त्यावेळी भाजपने मनोहर पर्रिकर यांना केंद्रिय संरक्षण मंत्री पद दिले. त्यामुळे पर्रिकर यांना गोव्याचे मुख्यमंत्री पद सोडावे लागले आणि संरक्षण मंत्रीपदाचे सुत्रे त्यांनी हाती घेतले. २०१७ मध्ये गोव्याच्या पुन्हा विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपला यश आले आणि पर्रिकर पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. गोव्याचे मुख्यमंत्री पद सांभाळण्यासाठी त्यांना केंद्रिय संरक्षण मंत्री पद सोडावे लागले.