Unlock : एंटरटेन्मेंट पार्कसाठी केंद्र सरकारची नियमावली जारी! वाचा काय आहेत नियम

unlock guidelines

कोरोनाचे रुग्ण देशभरात अजूनही वाढत असतानाच आर्थिक परिस्थिती ढासळू लागल्यामुळे केंद्र सरकारने Unlock सुरू केलं. यामध्ये वेगवेगळ्या आस्थापनांना टप्प्याटप्प्याने मंजुरी दिली जात आहे. मात्र ही मंजुरी देत असताना सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनासंदर्भातले नियम पाळण्याचं बंधन घालण्यात आलेलं आहे. त्या त्या आस्थापनांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे नियम घालून देण्यात आले आहेत. तसेच, केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारने देखील स्वतंत्रपणे अशा ठिकाणांसाठी वेगळे नियम बनवले आहेत. नुकतेच राज्य सरकारने हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट्स पुन्हा उघडताना कोणते नियम पाळायला हवेत, याविषयी नियमावली जारी केली होती. आता केंद्र सरकारने एंटरटेनमेंट पार्क आणि तशा प्रकारच्या मनोरंजनपर ठिकाणांसाठी नियमावली जारी केली आहे. तसेच, संबंधित राज्य सरकार, जिल्हा प्रसासनाने स्थानिक कोरोनासंदर्भातील परिस्थितीनुसार यात बदल करण्याची मुभा देखील दिली आहे. दरम्यान, नव्या नियमावलीनुसार फक्त कंटेनमेंट झोनच्या बाहेरील भागामध्येच एंटरटेन्मेंट पार्क सुरू ठेवता येतील. कंटेनमेंट झोनमधील एंटरटेनमेंट पार्क बंदच असतील.

काय आहेत नियम?

१. अशा ठिकाणी वावरताना किमान ६ फुटांचं अंतर ठेवणं आवश्यक
२. तोंडावर मास्क वापरणं बंधनकारक आहे
३. साबणाने नियमितपणे हात धुण्याची (किमान ४० ते ६० सेकंद) आणि सॅनिटायझर लावण्याची (किमान २० सेकंद) सोय उपलब्ध असावी
४. थुंकण्यावर सक्त मनाई असेल
५. सर्वांना आरोग्य सेतू मोबाईल App वापरण्याचा सल्ला
६. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, आजार असलेले नागरिक, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील मुलं यांनी शक्यतो घरीच थांबावे
७. या श्रेणीतील कामगारांनी अशा एंटरटेनमेंट पार्कमध्ये विशेष काळजी घ्यावी
८. अशी ठिकाणं नियमितपणे सॅनिटाईज करणं आवश्यक
९. वापरलेले मास्क वेगळ्या बंद डस्टबिनमध्येच टाकावेत
१०. स्विमिंग पूल हे वापरासाठी बंदच असतील.
११. वॉटर पार्क आणि वॉटर राईड्स पार्कमध्ये नियमितपणे पाणी स्वच्छ आणि फिल्टर होईल याची खातरजमा केली जावी
१२. अशा राईड्सवर मर्यादित संख्येतच लोकांना प्रवेश द्यावा
१३. सिनेमागृहांमध्ये फक्त ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेशाची परवानगी असेल
१४. ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी प्रेक्षकांना किंवा नागरिकांना प्रोत्साहन द्यायला हवं
१५. कोरोनासंबंधीची लक्षणं नसणाऱ्या लोकांना किंवा कर्मचाऱ्यांनाच अशा ठिकाणी प्रवेश दिला जावा