अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन

us president trump

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २०२१ च्या नोबेल शांतता पुरस्कासाठी (Nobel Peace Prize) नामांकन मिळालं आहे. इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे नामांकन मिळालं आहे. इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमधील शांतता करारासाठी मध्यस्थी करुन दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. या कराराने तब्बल ७२ वर्षानंतर दोघांमधील संघर्ष संपला.

नॉर्वोच्या संसदेचे सदस्य ख्रिश्चन टायब्रिंग-गजेडे यांनी ट्रम्प यांना नामांकित केलं आहे. ख्रिश्चन ‘नाटो’साठी काम करणाऱ्या नॉर्वेच्या संसदीय समितीचे अध्यक्षही आहेत. युएई आणि इस्रायलमधील संबंध सुधारण्यासाठी ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे असं ख्रिश्चन यांनी नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांच्या नावाचे समर्थन करताना सांगितलं. इतर कोणत्याही शांतता नोबेल पुरस्कार विजेत्यांपेक्षा ट्रम्प यांनी देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अधिक काम केल्याचं ख्रिश्चन यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना सांगितलं. तसंच मध्य आशियामधून अमेरिकन सैन्याला परत बोलवण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाचंही ख्रिश्चन यांनी कौतुक केलं आहे.

१३ ऑगस्टला युएई आणि इस्रायलने अमेरिकेच्या मध्यस्थीने आधीचे सर्व वाद विसरुन नव्याने सुरुवात करण्याची आणि एकमेकांना सहकार्य करणार असल्याची घओषणा केली. परस्पर सहकार्यासंदर्भातील करारांवर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.