Donald Trump यांना Twitter चा दणका; महिला पत्रकाराला केलेल्या ट्वीटमुळे अकाऊंट लॉक!

donald trump twitter account locked

सोशल मीडियाचा योग्य वापर आणि गैरवापर या दोन्ही गोष्टी कायम चर्चेत असतात. बहुतेक वेळा सोशल मीडियाचा गैरवापरच जास्त चर्चेत असतो. नुकतेच Facebook वर भारतात राजकीय दृष्टी संवेदनशील Content वर संशयास्पद भूमिका घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यावर फेसबुकला स्पष्टीकरण देखील द्यावं लागलं होतं. या बाबतीत ट्वीटरनं पुढच्यास ठेच, मागचा शहाणा या उक्तीचा वापर करत आधीच आपली Privacy Policy कडक करत ट्वीट्सवर नजर ठेवायला सुरुवात केली आहे. त्यांच्या या धोरणाचा फटका खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील बसला आहे. इतका की ट्रम्प यांनी केलेलं एक ट्वीट वादग्रस्त आढळल्यानंतर ते ट्वीट डिलीट करेपर्यंत ट्वीटरनं त्यांचं अकाऊंटच ब्लॉक केलं होतं! आता ट्वीटरच्या धोरणानुसार पुन्हा जर डोनाल्ड ट्रम्प यांनी काही चुकीचं ट्वीट केलं, तर थेट त्यांचं अकाऊंट कायमस्वरूपी बंद होणार असल्यामुळे ट्रम्प यांना ट्वीटरचा चांगलाच दणका बसला आहे!

नक्की झालं काय?

याआधीही Donald Trump यांचे काही ट्वीट्स ट्वीटरनं आक्षेपार्ह किंवा चुकीची माहिती पसरवणारे म्हणून लेबल केले होते. त्यात सोमवारी ट्रम्प यांनी एका महिला पत्रकाराला केलेलं ट्वीट वादात सापडलं. बिझनेस इनसायडरने दिलेल्या वृत्तानुसार Miranda Devine या महिला पत्रकाराने New York Post या दैनिकात ट्रम्प यांना कोरोनाशी लढा देण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर ट्रम्प यांनी ट्वीट करून ‘Thank You’ असा प्रतिसाद दिला. आणि त्यांचं हेच ट्वीट वादात सापडलं.

महिलेला मेलवर आक्षेपार्ह मेसेजेस

ट्रम्प यांनी थँक-यू म्हणताना संबंधित महिला पत्रकाराचा इमेल आयडी देखील या ट्वीटमध्ये लिहिला. त्यामुळे ट्वीटरने पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या ट्वीटवर शेरा मारला आणि अकाऊंट काही काळासाठी लॉक केलं. ट्रम्प यांनी महिला पत्रकाराचा मेल आयडी नमूद केल्यामुळे महिलेच्या मेलवर अनेक आक्षेपार्ह मेसेज येऊ लागले. ‘ट्वीटरवर कुणीही इतरांची खासगी माहिती त्यांच्या परवानगीशिवाय जाहीर करू शकत नाही’, असं ट्वीटरचं धोरण असल्यामुळे ट्रम्प यांचं अकाऊंट लॉक करण्यात आलं. शेवटी ट्रम्प यांनी ट्वीट डिलीट केल्यानंतरच त्यांचं अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात आलं.

पुन्हा चूक केल्यास अकाऊंट थेट बंद होणार!

दरम्यान, ट्वीटरच्या धोरणानुसार पहिल्या वॉर्निंगनंतर एखाद्या युजरने पुन्हा तशीच चूक केली, तर संबंधित युजरचं अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याची तरतूद आहे. ट्रम्प यांनी ट्वीटरच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांना पहिली वॉर्निंग मिळाली आहे. आता पुन्हा तशी चूक झाल्यास खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं अकाऊंट बंद होण्याची नामुष्की ओढवू शकते.