राजस्थाननंतर उत्तर प्रदेशमधील पुजाऱ्यावर जीवघेणा हल्ला

याप्रकरणी ४ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांचा आधिक तपास सुरू आहे.

uttar pradesh temple priest shot in gonda lucknow referred
राजस्थाननंतर उत्तर प्रदेशमधील पुजाऱ्यावर जीवघेणा हल्ला

राजस्थान मधील करौली आणि उत्तर प्रदेशच्या बागपातनंतर गोंडा जिल्ह्यामधील एका मंदिराच्या पुजाऱ्यावर हल्ला झाला आहे. गोंडा येथील राम जानकी मंदिराचे पुजारी सम्राट दास यांच्यावर शनिवारी रात्री गोळ्या मारण्यात आल्या. गंभीर जखमी झालेल्या पुजारींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला लखनऊ येथे हलवण्यात आले. ही घटना इटियाथोक पोलिस ठाण्यांतर्गत तिरे मनोरमाची आहे. यापूर्वी करौलीमध्ये पुजाऱ्याला जिवंत जाळण्याची घटना समोर आली होती. तर बागपतमध्ये एका साधूचा मृतदेह नदीत सापडल्याची घटना घडली होती.

माहितीनुसार, दरोडेखोरांनी मंदिर परिसरात घुसून पुजाऱ्याला गोळ्या घातल्या. महंत सम्राट दास यांच्यावर जमीनच्या वादामुळे हा हल्ला केला आहे. यापूर्वी देखील त्यांच्यावर जमिनीच्या वादामुळे हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर मंदिरात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

वृत्तसंस्था एएनआयनुसार गोंडचे पोलीस अधीक्षक शैलेश कुमार पांडे यांनी सांगितले की, ‘इटियाथोक येथील एका गावातील मंदिराच्या पुजाऱ्याला शनिवारी रात्री गोळ्या घातल्या गेल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुजाऱ्याचे आरोपींसोबत जमीनवरून वाद होते. आम्ही याप्रकरणाचा अधिक तपास करत आहोत.’

माहितीनुसार, सध्या महंत स्रमाट दास यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून ते या मंदिरात राहत आहेत. या घटनेमागे भूमाफियांचा हात असावा असे म्हटले जात आहे.


हेही वाचा – Hathras Rape Case: सीबीआयकडून आरोपींविरोधात गुन्हा दाखल, तपासासाठी समिती गठीत