काय म्हणता? विजय माल्ल्या फरार नाही!

देशाचे ९ हजार कोटी गायब करून लंडनमध्ये जाऊन बसलेला विजय माल्ल्या फरार नसल्याचा अजब दावा त्याच्या वकिलांनी कोर्टामध्ये केला आहे. ईडीने मात्र त्यांचा दावा फेटाळून लावला आहे.

Mumbai
Vijay Mallya
विजय माल्ल्या

देशाचे सुमारे ९ हजार कोटी बुडवून लंडनला फरार झालेलाय किंगफिशरचा सर्वेसर्वा आणि करबुडव्या विजय माल्ल्या हा मुळात फरार नाहीच असा दावा आता केला जात आहे. विजय माल्ल्याच्या वकिलांनी यासंदर्भातला दावा केला असून त्यावर आता नेटिझन्सकडून आणि सामान्य नागरिकांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विजय माल्ल्याच्या करवुडव्या प्रकरणाची सुनावणी सध्या विशेष मनी लाँडरिंग कोर्टापुढे सुनावणी सुरू आहे. त्याला फरार घोषित करावं की नाही यासंदर्भात ही सुनावणी सुरू आहे. त्या सुनावणीदरम्यान विजय माल्ल्याच्या वकिलांनी हा दावा केला आहे. त्यांच्या मते भारतीयांचे ९ हजार कोटी घेऊन लंडनमध्ये जाऊन बसलेला माल्ल्या मुळात फरार नाहीच!

नक्की काय म्हणणं आहे माल्ल्याच्या वकिलांचं…

विजय माल्ल्या जरी सध्या लंडनमध्ये असला तरी त्याला फरार म्हणता येणार नाही, असा दावा त्याचे वकील अमित देसाई यांनी केला आहे. ‘माल्ल्या जेव्हा लंडनला गेले, तेव्हा त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आलं नव्हतं. ते वर्ल्ड मोटर स्पोर्ट्सच्या परिषदेसाठी २ मार्च २०१६ रोजी लंडनला गेले होते. कोणताही कारवाई टाळण्यासाठी ते पळून गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांना फरार म्हणता येणार नाही’, असं देसाई यांनी कोर्टाला सांगितलं. तसेच, ‘माल्ल्या यांना देशाच्या राज्यघटनेनुसार कुठेही जाण्याचा अधिकार आहे’, असं देखील त्यांनी यावेळी न्यायालयासमोर बाजू मांडताना सांगितलं.


तुम्ही हे वाचलंत का? – कुणी घर देता का घर? विजय माल्ल्या रस्त्यावर

…पण माल्ल्याचं ऐकणार ती इडी कसली?

दरम्यान, इडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाकडून माल्ल्याच्या या दाव्याचा समाचार घेण्यात आला आहे. विशेष कोर्टात बाजू मांडताना इडीने माल्ल्याचा दावा खोडून काढला आहे. ‘माल्ल्याने आधीच कर्ज आणि इतर आर्थिक बाबींमधले नियम मोडले होते. त्यामुळे तो आधीच गुन्हेगार होताच. त्याला भारतात आणण्यासाठी आम्हाला प्रत्यार्पण कराराचा आधार घ्यावा लागत आहे. आणि तसं करून देखील आम्हाला त्याला भारतात आणता येत नाहीये. त्यामुळे त्याला ‘फरार’ असंच म्हणावं लागेल’, अशा शब्दांत इडीने माल्ल्याचे वकील अमित देसाई यांचा दावा खोडून काढला.

काय आहे प्रकरण?

देशभरातल्या बँकांकजून एकूण सुमारे ९ हजार कोटींचं कर्ज घेऊन ते बुडवल्याचा आरोप विजय माल्ल्यावर लावण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये त्याच्याविरोधात सबळ पुरावे देखील इडीला मिळाले आहेत. मात्र, आपल्याविरोधात कारवाई होईल याची कुणकुण आधीच लागलेला माल्ल्या २ मार्च २०१६ रोजी लंडनमध्ये पळून गेला. त्याच्याकडे लंडनचं नागरिकत्व असल्यामुळे आणि त्याला भारतीय वॉरंटच्या आधारावर लंडनमध्येच अटक केल्यामुळे तो लंडन कोर्टाचा गुन्हेगार ठरला. त्यामुळे त्याच्यावर आधी लंडन कोर्टामध्ये सुनावणी होऊन नंतर त्याला भारताच्या ताब्यात दिलं जाण्याची शक्यता आहे. ब्रिटन आणि भारतामध्ये झालेल्या प्रत्यार्पण कराराच्या मदतीने माल्ल्याने भारतामध्ये अटक होण्यापासून स्वत:ला वाचवून ठेवलं आहे. सध्या लंडन कोर्टाकडून या प्रकरणात जामीन मिळवून विजय माल्ल्या मोकाट फिरत आहे. त्यामुळे त्याला भारतात आणण्यासाठी भारतीय संस्था प्रयत्न करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here