घरदेश-विदेशअमित शाहांच्या रॅलीमध्ये राडा; TMC-BJP कार्यकर्त्यांची जाळपोळ

अमित शाहांच्या रॅलीमध्ये राडा; TMC-BJP कार्यकर्त्यांची जाळपोळ

Subscribe

कोलकात्यामध्ये अमित शहांच्या प्रचार सभेदरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक आणि बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे.

११ एप्रिलपासून शांततेत सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेला शेवटच्या ७व्या टप्प्यापूर्वी गालबोट लागलं. कोलकात्यामध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाली. तसेच, यावेळी भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर दगडफेक देखील झाली. या घटनेमध्ये अद्यापपर्यंत कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नसून या प्रकाराची भाजपकडून निंदा केली जात आहे. येत्या १९ तारखेला शेवटच्या ७व्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. एकूण ८ राज्यांमधल्या ५९ मतदारसंघांमध्ये या टप्प्यात मतदान होईल. यामध्ये बिहार (८ जागा), झारखंड (३ जागा), मध्य प्रदेश (८ जागा), पंजाब (१३ जागा), प. बंगाल (९ जागा), चंदीगड (१ जागा), उ. प्रदेश (१३ जागा) आणि हिमाचल प्रदेश (४ जागा) या राज्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

कॉलेज स्ट्रीट रोडवर घडली घटना

पश्चिम बंगालमधल्या ९ जागांसाठी मतदान होत असून त्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये भाजप पक्षाध्यक्ष अमित शाह आणि भाजपच्या ज्येष्ठ नेतेमंडळी पूर्ण ताकदीनं प्रचारात उतरली आहेत. त्याचसाठी अमित शाह यांची मंगळवारी कोलकात्यामध्ये प्रचारसभा होती. यावेळी कोलकात्याच्या कॉलेज स्ट्रीट मार्गावरून कोलकाता विद्यापीठाजवळून रॅली जात असताना अचानक रॅलीच्या दिशेने लाठ्या फेकण्यात आल्या. त्यापाठोपाठ दगडफेकीला सुरुवात झाली. जाळपोळही झाली. काही काळानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचं समोर आलं. यावेळी टीएमसी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली. त्यामुळे घटनास्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

- Advertisement -

‘तृणमूलच्या गुंडांनीच हे केलं’

या घटनेनंतर भाजपकडून ममता बॅनर्जी आणि प. बंगाल सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. ‘ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने केलेल्या हिंसाचाराचा मी निषेध करतो. या हिंसेला मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून उत्तर द्यावं असं मी आवाहन करतो’, अशा शब्दांत अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. तसेच, ‘तृणमूलचे गुंड या रॅलीमुळे गोंधळून गेले होते आणि म्हणूनच त्यांनी हल्ला केला’, असं देखील अमित शाह या घटनेनंतर टीका करताना म्हणाले. दरम्यान, भाजपच्या या रॅलीला परवानगी नसताना देखील रॅली काढण्यात आल्याचं बोललं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -