फॉरवर्ड मेसेजचे साईड इफेक्ट्स, जिवंत अभिनेत्रीलाच श्रद्धांजली वाहून मोकळे!

model actress samskruthy shenoy 2

हल्ली प्रकाशापेक्षाही जास्त वेगाने सोशल मीडियावर अफवा वेगाने पसरू लागल्या आहेत. कोरोना काळात तर या अफवांना ऊत आल्याचं सगळ्यांनीच पाहिलं. अशा प्रकारच्या अफवांमुळे अनेकदा गंभीर परिस्थिती ओढवते. अनेकदा या अफवा नंतर फॅक्ट चेकच्या माध्यमातून उघड्या पडतात आणि त्या फॉरवर्ड करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसते. पण असं झालं म्हणजे अशा अफवा उठणं कमी मात्र होत नाही. तसाच एक प्रकार नुकताच उघड झाला असून यामध्ये चक्क एका दाक्षिणात्य अभिनेत्रीलाच सोशल मीडियावरच्या ‘अफवाकारां’नी श्रद्धांजली वाहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे ही अभिनेत्री त्रस्त झाली असून त्यासंदर्भात तिने एक सविस्तर पोस्टच फेसबुकवर टाकून खुलासा केला आहे.

तर त्याचं झालं असं…

काही दिवसांपासून सोशल मीडियावर, विशेषत: फेसबुकवर, एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये गुजरातमध्ये एका महिला डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे तिला श्रद्धांजली वाहण्यात आली होती. या महिला डॉक्टरचं नाव डॉ. विधी असं पोस्टमध्ये लिहिलं होतं. ‘गुजरातमधून एक दु:खद बातमी येत आहे. डॉ. विधी नावाच्या एका गायनेकॉलॉजिस्टचा अहमदाबादमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो’, असा संदेश या फेसबुक पोस्टमध्ये लिहिला होता. पण पोस्ट लिहिणाऱ्यानं डॉक्टरचा फोटो तपासून न घेता थेट अपलोड केल्यामुळे मोठा गोंधळ झाला.

अभिनेत्रीच्या पोस्टमुळे आलं सत्य बाहेर!

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यावर शेकडो लोकांनी श्रद्धांजलीचे संदेश लिहिले. पण काही दिवसांनी संस्कृती शेनॉय नावाच्या एका दाक्षिणात्य मॉडेल आणि अभिनेत्रीने या पोस्टवर आक्षेप घेणारी पोस्ट टाकली. कारण पोस्टमध्ये लावण्यात आलेला फोटो या अभिनेत्रीचा होता. २०१६मध्ये हाच फोटो या अभिनेत्रीने आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला होता. तोच फोटो उचलून डॉ. विधी यांच्या वृत्ताला लावण्यात आला होता. इंडिया टुडेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

Dear Friends, This is me, Samskruthy Shenoy / Samy, aged 22, from Kochi. Some miscreants are spreading this photograph…

Posted by Samskruthy Shenoy on Sunday, September 13, 2020

दरम्यान, या प्रकारानंतर संस्कृती शेनॉयनं तिच्या फेसबुकवर पोस्ट करून खुलासा केला. ‘मी संस्कृती आहे. हा माझा फोटो आहे. डॉ. विधी यांच्या निधनाच्या वृत्ताला माझा फोटो व्हायरल होणाऱ्या फेसबुक पोस्टमध्ये लावण्यात आलेला आहे. मी डॉ. विधी यांना ओळखत नाही. जर त्याचं खरंच निधन झालं असेल, तर मी त्यांना श्रद्धांजली वाहते. पण फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती मी आहे. त्यामुळे अशा प्रकारचे संदेश फॉरवर्ड करू नका’, असं संस्कृतीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.