Delhi Air Pollution: गोवा आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये ट्विटर वार

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात ट्विटरवरून चांगलीच जुंपली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दिल्लीत सध्या वायू प्रदूषणाने कहर केला आहे. पंजाबमध्ये जाळण्यात येणाऱ्या सुकऱ्या गवतामुळे दिल्ली-एनसीआरसहीत उत्तर भारतातील अनेक ठिकाणी वायू प्रदूषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता या मुद्द्यावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात ट्विटरवरून चांगलीच जुंपली आहे. केजरीवाल यांनी गोव्यामध्ये पर्यावरणासंदर्भात सुरु असणाऱ्या विरोध प्रदर्शनाला पाठिंबा दर्शवणारी प्रतिक्रिया ट्विटरवरुन दिली.

यावेळी त्यांनी राज्यातील भाजपाला चांगलेच धारेवर धरले. मात्र आता केजरीवाल यांच्या या ट्विटला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. दरम्यान केजरीवाल यांनी पर्यावरण संरक्षणासाठी लढणाऱ्या गोव्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांचे ट्विटरवरुन कौतुक केले. मात्र त्याचवेळी त्यांनी राज्यातील भाजपा सरकारवरही निशाणा साधला.

प्रदूषणाच्या समस्येवर लक्ष देण्याचा दिला सल्ला

राज्यात होणारे विरोधप्रदर्शन दाबून टाकण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. याच ट्विटवर उत्तर देताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांना दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. केजरीवाल यांनी गोव्याची चिंता करु नये असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे. तर याला प्रत्युत्तर देत सावंत यांच्या या ट्विटवर केजरीवाल यांनी पुन्हा ट्विट करुन, “ही समस्या केवळ दिल्ली किंवा गोव्यातील प्रदूषणाबद्दलची नाहीय. दिल्ली आणि गोवा दोन्ही मला प्रिय आहेत. आपण एकाच देशाचे नागरिक आहोत. आपल्याला एकत्र येऊन हे दिल्ली आणि गोव्यात प्रदूषण होणार नाही यासाठी काम केले पाहिजे,” असे म्हटले.