पुलवामा येथे दहशतवाद्यांचा सामना करताना भारतीय लष्कराचे मेजर विभूती शंकर धोंडियाल यांना वीरमरण आले. धोंडियाला यांच्या जाण्याने संपूर्ण देशात दु:खाची लाट पसरली. मंगळवारी धोंडियाल यांच्यावर त्यांच्या देहरादूनमधील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या शेकडो लोकांसोबत धोंडियाल यांच्या कुटुंबीयांच्या दु:खाला बांध फुटला होता. मात्र, या कठीण प्रसंगी शहीद मेजर धोंडियाल यांची पत्नी खंबीरपणे उभी होती. आपल्या अश्रूंना आवर घालत ती वीरपत्नी बहुधा स्वत:च स्वत:ची समजूत घालत होती. एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या काही फोटो आणि व्हिडिओवरुन ते स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, ज्यावेळी शहीद धोंडियाल यांना अखेरचा निरोप देण्याचा प्रसंग आला त्यावेळी या वीरपत्नीने ‘I Love You’ म्हणत आपल्या पतीला निरोप दिला. या अत्यंत हळव्या क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#WATCH Wife of Major VS Dhoundiyal (who lost his life in an encounter in Pulwama yesterday) by his mortal remains. #Dehradun #Uttarakhand pic.twitter.com/5HWD6RXwnO
— ANI (@ANI) February 19, 2019
आपल्या शहीद पतीला निरोप देतेवेळी वीरपत्नीने राखलेल्या धैर्याचं देशभरातून कौतुक होत आहे. तर दुसरीकडे अगदी शेवटच्या क्षणी पतीला ‘I Love You’ म्हणत तिने व्यक्त केलेल्या प्रेमाच्या प्रसंगामुळे देशवासीयांचे डोळेदेखील पाणावले आहेत. कुणाच्याही अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आणेल असाच हा प्रसंग आहे. निकिता कौल धोंडियाल असं या वीरपत्नीचं नाव आहे. एकीकडे वीरपत्नी म्हणून धैर्य राखणाऱ्या निकिता यांचा नवऱ्यापासून अखेरचं लांब होतानाचं ‘Love You’ म्हणणं हे पाहाणाऱ्याला हेलावून टाकणारं आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अत्यंत वेगाने व्हायरल होत आहे. दरम्यान, मेजर धोंडियाल यांच्या अंतिम निरोपाच्या क्षणाचे काही फोटोही एनएआयने प्रसिद्ध केले आहेत.
पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये ४० हून अधिक जवानांनी आपले प्राण गमावले. या सर्व शहीदांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या धैर्याला मनापासून सलाम!
Dehradun: Wife (pic 1) of Major VS Dhoundiyal salutes as people pay tribute to him. He lost his life in an encounter in Pulwama yesterday #Uttarakhand pic.twitter.com/GEL36EMU3e
— ANI (@ANI) February 19, 2019