घरदेश-विदेशकर्नाटकात रंगतोय सत्ता स्थापनेचा सारीपाट! काँग्रेस की भाजपा?

कर्नाटकात रंगतोय सत्ता स्थापनेचा सारीपाट! काँग्रेस की भाजपा?

Subscribe

कर्नाटकमध्ये कोणाची सत्ता येणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. कर्नाटकात भाजपच सत्ता स्थापन करेल, असं काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत चालू आहे. निवडणुकीआधी दोन्ही पक्षांनी प्रचारासाठी घेतलेल्या मेहनतीचे फळ आता त्या त्या पक्षाला मिळाले आहे. कर्नाटक निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ ठिकाणी सभा घेतल्या होत्या. तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी १४ ठिकाणी सभा घेतल्या. मात्र राहुल गांधी यांनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्याच ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यासाठी घेतलेली मेहनत निष्फळ ठरली आहे.

मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी, जीएसटी यासारख्या निर्णयांवर कर्नाटकातील जनता नाराज होती, असे निवडणुकीपूर्वी बोलले जायचे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा काँग्रेसने केली होती. त्यामुळे लिंगायत समाजाचा काँग्रेसला पाठिंबा असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आजच्या निकालानंतर हे चित्र पालटले. लिंगायत समाजाचा सर्वात जास्त प्रभाव असलेल्या जागांवर भाजप आघाडीवर असून, त्याठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. वोक्कलिंग समाजाचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी देखील भाजपने ७ जागांवर विजय मिळवला.

- Advertisement -

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा येणारा निकाल पाहता कर्नाटकावर भाजपचा झेंडा फडकेल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला होता. मात्र आता कर्नाटकात कोणाचे सरकार येणार यावर सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे. काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दर्शवला आहे. कारण पराभूत झालेल्या काँग्रेसने आता जनता दल सेक्युलरचे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. भाजपने १०४ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेस ७८ जागांवर विजयी झाले. तर जनता दल ३७ जागांवर विजयी झाले आहे.

भाजपच्या पारड्यात सध्या तरी १०४ आमदार आहेत. तर काँग्रेसने जनता दलाला पाठिंबा दिल्याने काँग्रेसचे ७८ आणि जनता दलाचे एकूण ३७ आमदार या दोघांची बेरीज ११६ होत आहे. सत्ता स्थापनेसाठी ११२ आमदारांची गरज आहे. भाजपकडे सध्या १०४ आमदार आहेत. त्यामुळे त्यांना आणखी ७ आमदारांची आवश्यकता आहे. हे ७ आमदार मिळवण्यासाठी भाजप जनता दल आणि काँग्रेस यांच्यातील आमदार फोडण्याचे काम करु शकतील. कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद व इतर वरिष्ठ नेत्यांची काल भेट घेतली.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -