घरCORONA UPDATECoronaFight : केरळला जे जमलं ते महाराष्ट्राला का नाही?

CoronaFight : केरळला जे जमलं ते महाराष्ट्राला का नाही?

Subscribe

यावर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरीस केरळमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला. चीनच्या वुहान प्रांतातून आलेला तो रुग्ण केरळचाच नव्हे, तर भारतातील पहिला रुग्ण होता! त्यानंतर केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळणे ही नित्याची बाब झाली. इबोला, सार्स अशा विषाणुंनीही जिथून भारतात प्रवेश केला, त्याच केरळ राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत होते. साधारण ३ मार्च रोजी केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचे सारख्याच संख्येत रुग्ण होते. मात्र, त्यानंतर दीड महिन्यांतच महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर गेले, तर केरळमध्ये ३८८ रुग्णच सापडले. केरळमध्ये रुग्णवाढीची संख्या खूपच मर्यादित राहिली. आज महाराष्ट्रात कोरोनामुळे १८९ बळी गेले आहेत, तर केरळमधील मृतांची संख्या फक्त ३ आहे. केरळला जमले ते महाराष्ट्राला का जमू शकले नाही? केरळ सरकारने कोरोनाला निगेटिव्ह करण्यासाठी जो पॉझिटिव्हनेस दाखवला त्याचीच ही फलश्रृती आहे. तर महाराष्ट्रात पॉझिटिव्ह रुग्णांची ओळख पटण्यास होणारा विलंब, घरोघरी जाऊन तपासणी न होणे आणि सरकारी यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव या मुख्य कारणांमुळे महाराष्ट्र मात्र मागेच राहिला.

केरळमध्ये आता कोरोना रुग्णांची संख्या दोन अंकांवर आली आहे. निगेटिव्ह चाचण्यांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. मृतांचा आकडा तर फक्त ३ वरच येऊन ठेपला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होण्याचे प्रमाण १७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तर दुसर्‍या बाजूला महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील सहा दिवसांत रोज सापडणार्‍या कोरोनाबाधितांची संख्या सरासरी २०० च्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत १८७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होण्याचे प्रमाण फक्त ७ टक्के इतके आहे. बुधवारपर्यंत केरळमध्ये एकूण कोरोना रुग्ण ३८८ होते. तर राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या ३०२६ वर पोहोचली आहे.

- Advertisement -

नक्की घडलं काय?

  • करोना निगेटिव्हसाठी महाराष्ट्र सरकारचा निगेटिव्हनेस!
  • पॉझिटिव्ह रुग्णांची ओळख पटण्यास विलंब
  • घरोघरी जाऊन तपासणी नाही
  • सरकारी यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव

केरळला कोरोनावर प्रतिबंध घालणे, त्याला अटकाव करणे सहज सोपे गेले. त्याची नेमकी कारणे काय? असा प्रश्न आता प्रत्येकाला पडला आहे. केरळने असे काय केले की ते कोरोनाला आळा घालू शकले. कोरोनाला आळा घालण्यात केरळ यशस्वी झाला त्याचे मुख्य कारण तेथील जनतेची केरळ सरकार आणि प्रशासनाला पहिल्यापासून मिळालेली गंभीर आणि खंबीर साथ! केरळमध्ये साक्षरतेचे प्रमाण १०० टक्के आहे. त्यामुळे तेथे कोरोनाबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना हा केवळ संपर्क टाळूनच रोखला जाऊ शकतो, हे तिथल्या जनतेला त्वरीत समजले आणि उमजले. त्यामुळे लॉकडाऊन, संचारबंदी अशा शासकीय उपायांना केरळमधील जनतेने चांगला प्रतिसाद दिला. काही ठिकाणी तिथल्या सरकारला सक्ती करावी लागली असली तरी एकंदरीत केरळी जनता याबाबत सरकारच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली. पोलिसांवर, आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ल्याचा एकही प्रकार केरळमध्ये घडला नाही. जनता सक्षमपणे पाठिशी उभी राहिल्यामुळे तिथल्या सरकारला आरोग्यविषयक उपाययोजना तातडीने राबवणे शक्य झाले.

- Advertisement -

केरळने काय केले?

कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर केरळ सरकारने आंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांची साथ घेऊन घरोघरी जाऊन चाचण्या घेण्यास सुरुवात केली. तसेच तात्काळ परिक्षणे केली. रुग्ण कोणाच्या संपर्कात आला? याची तातडीने यादी बनवली. हॉस्पिटलमध्ये दाखल प्रत्येक कोरोना रुग्णावर तात्काळ इलाज होईल, याची खात्री केली. हायरिस्क विभागांची नोंद करून तेथे कायम स्वरूपी आरोग्य कर्मचारी तैनात केले. अशा उपायांमुळे आज केरळ कोरोनाला अटकाव करण्यास समर्थ ठरले आहे. अर्थात केरळ राज्य हे छोटे आहे. तेथील लोकसंख्या मर्यादित आहे. पुन्हा स्थलांतरीत मजुरांची संख्या कमी आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही. पण तरीही केरळने जे केले ते निश्चितच प्रशंसनीय आहे.

महाराष्ट्राला हे का जमले नाही?

या उलट महाराष्ट्रात जनतेने सरकारला साथ दिली नाही. पोलिसांवर, आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ले झाले. प्रशासनाची निम्मी ताकद लोकांना घरी बसवण्यात खर्ची झाली. त्यामुळे आरोग्यसेवेकडे जितके लक्ष देणे आवश्यक होते ते दिले गेले नाही. रुग्णांना शोधण्यासाठी आरोग्य सेविकांची मदत जरी घेतली जात असली तरी ती अपुरी आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह पेशंट ओळखणे कठीण झाले. घरोघरी जाऊन तपासण्या झाल्या नाहीत. मुंबईसारख्या झोपड्यांच्या शहरात आरोग्यसेविका प्रत्येक घरापर्यंत पोहोचणेही मुश्किल झाले. पुन्हा पीपीई किट आणि आरोग्यसेविकांच्या योग्य प्रशिक्षणाच्या अभावामुळे या आरोग्यसेविका लोकांमध्ये जाण्यास घाबरू लागल्या. सरकारी यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव दिसला. कोरोना चाचणीबद्दल सरकारी लॅब आणि खासगी लॅबच्या अहवालांमध्ये तफावती आढळून आल्या. त्यामुळे गंभीर रुग्णही चटकन लक्षात आले नाहीत. त्यांच्यावर तातडीने इलाज शक्य झाले नाहीत. परिणामी मृतांची संख्या वाढली. वन रुपी क्लिनिक सारख्या आरोग्य संस्थांची साथ वेळीच घेतली गेली नाही. राजकीय आंदोलन करण्यास पुढे असलेल्या स्वयंसेवी संस्थाही या कसोटीच्या काळात गायब झाल्या. अशा काही महत्त्वाच्या ठरलेल्या कारणांमुळे आजही महाराष्ट्राला कोरोनाला अटकाव करणे तितक्या प्रभावीपणे जमलेले नाही.

या दोन्ही राज्यांनी केलेले उपाय आणि मिळालेले परिणाम यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ही कारणं अधिक स्पष्ट होऊ शकतील.

२६ मार्चपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या

  • महाराष्ट्र : १२२
  • केरळ : १२०

१६ एप्रिलपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या

  • महाराष्ट्र : ३०२६
  • केरळ : ३८८

आत्तापर्यंत बरे होऊन घरी गेलेले रुग्ण

  • महाराष्ट्र : २९५
  • केरळ : १५६

कोरोनामुळे झालेले मृत्यू

  • महाराष्ट्र : १८९
  • केरळ : ३

कोरोनाच्या झालेल्या चाचण्या

  • महाराष्ट्र : ५२,०० (४८,१९८ निगेटिव्ह)
  • केरळ : १४,१६३ (१२,८१८ निगेटिव्ह)

दर १० लाख व्यक्तींमागे झालेल्या चाचण्या

  • महाराष्ट्र : २९८
  • केरळ : ४०१
Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -