सतत फेसबुकवर व्यस्त असणाऱ्या पत्नीचा पतीकडून खून

Jaipur
wife use facebook husband killed her

तंत्रज्ञान जसे फायद्याचे आहे, तसे त्याचे काही तोटे देखील आहेत. स्मार्टफोनमुळे डिजिटल जगात क्रांती झाली असली तरी मानवी नातेसंबंधावर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. स्मार्टफोनवर पुर्ण दिवस व्यस्त असणाऱ्या एका पत्नीचा पतीने खून केला आहे. ही घटना राजस्थानच्या जयपूर येथे घडली आहे. आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पतीने दिलेली माहिती सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या लोकांसाठी धक्कादायक अशी आहे.

आरोपीचे नाव अयाज अहमद अन्सारी (२६) तर मृत पत्नीचे नाव रेश्मा उर्फ मंगलानी (२२) होते. अयाजने पत्नीला बाहेर फिरायला जाऊ असे सांगून जयपूर-दिल्ली महामार्गावर नेऊन तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून दगडाने ठेचून टाकला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अयाज म्हणाला की, माझी पत्नी सतत फेसबुकवर ऑनलाईन असायची. तिचे फेसबुकवर सहा हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. ती सतत फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करायची. पत्नीच्या या सवयीमुळे दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची. शेवटी अयाजने पत्नीचा काटा काढला.

या प्रकरणाची चौकशी ओमर पोलीस स्टेशनचे पोलीस आयुक्त अशोक कुमार गुप्ता म्हणाले की, दिल्ली महामार्गालगत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाच्या शेजारी स्कूटी आणि हेल्मेट देखील आढळून आले होते. मात्र महिलेची ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता. मृतदेहाची ओळख पटल्यानतंर पोलिसांनी रेश्माच्या पालकांची चौकशी केली असता त्यांनी पती अयाजवर संशय व्यक्त केला.

अयाज आणि रेश्मा यांचा आंतरधर्मीय विवाह झाला होता. त्यांना तीन महिन्यांचा एक मुलगा आहे. अयाज रेश्माच्या चारित्र्यावर सतत संशय घ्यायचा. लग्नाच्या काही दिवसानंतरच त्यांच्यात खटके उडायला सुरु झाले होते. त्यामुळे एक वर्षापासून रेश्मा पतिपासून विभक्त राहत होती. त्यामुळे संतापलेल्या अयाजने भांडण मिटवण्याचे कारण सांगून रेश्माला घरातून बाहेर नेले. आधी दोघांनीही मद्यपान केले आणि नंतर अयाजने रेश्माचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी तपासाअंती दिली.