प्रेयसीचा ‘शोले’ स्टाईल राडा; प्रियकरानं लग्नाला विरोध केला म्हणून चढली बोर्डावर!

आत्तापर्यंत प्रेमात वेडे झालेल्या तरुणांनी शोले स्टाईल राडा केल्याचं आपण अनेकदा ऐकलं आहे. कुणी विजेच्या खांबावर चढतं, तर कुणी बिल्डिंगच्या गच्चीवर उभं राहून आपल्या प्रेमासाठी आरडा-ओरडा करताना दिसतं. पण आजपर्यंत कुणी एखाद्या मुलीला प्रियकरासाठी असा राडा करताना दिसलं नाही. पण इंदौरमधल्या एका तरुणीने तीही कसर भरून काढली आहे. प्रियकर लग्नाला नकार देत असल्यामुळे त्याला राजी करण्यासाठी ही तरुणी थेट एका जाहिरातीच्या बोर्डावर चढून बसली होती. किमान २ तास हा राडा झाल्यानंतर अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने तरुणीला खाली उतरवण्यात यश मिळालं. पण त्यांच्या लव्ह स्टोरीचा मात्र पर्याय निघू शकला नाही.

नक्की घडलं काय?

हा प्रकार इंदौरच्या परदेशीपुरा भागातला आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास एक तरुणी शहरातल्या ३० फूट उंच एका जाहिरातीच्या बोर्डावर चढून बसली होती. यावेळी ती वारंवार कुणाशीतरी फोनवर बोलत होती. जोपर्यंत प्रियकर लग्नासाठी तयार होत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचं तिचं म्हणणं होतं. या दरम्यान या जाहिरात फलकाच्या खाली बरीच गर्दी जमा झाली. अखेर कुणीतरी पोलिसांना बोलावून आणलं.

पोलिसांनी देखील तरूणाला समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, ही तरूणी पोलिसांचं देखील ऐकायला तयार नव्हती. अखेर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून प्रकार समजून घेतला. शेवटी, तरूणीला पोलिसांनी थेट तरुणासोबत लग्न लावून देण्याचं आश्वासन दिलं, तेव्हा कुठे ही तरूणी खाली उतरली. शेवटी पोलिसांनी तरूणीला घरच्यांच्या ताब्यात दिलं.

नक्की काय प्रकार आहे?

वास्तविक हा सगळा एकतर्फी प्रेमाचा मामला होता. या तरुणीचं संबंधित तरुणावर एकतर्फी प्रेम होतं. मात्र, तरूण लग्नासाठी तयार नव्हता. त्यामुळे त्याला राजी करण्यासाठी तरूणीनं अशा प्रकारे आंदोलनाचं हत्यार वापरलं. दरम्यान, दोन्ही कुटुंबीयांच्या मध्यस्थीने प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.