जागे व्हा, २०२० हे वर्ष असेल सर्वात ‘ताप’दायक!

२०२० हे वर्ष पृथ्वीवरील सर्वच जीवांसाठी अधिक 'ताप'दायक असणार आहे. त्याहीपुढे जाऊन पुढचं दशक हे आत्तापर्यंतच सर्वाधिक उष्ण दशक असणार आहे.

Mumbai
global warming effects
प्रातिनिधिक चित्र

ग्लोबल वॉर्मिंग म्हटलं, की अनेकांना त्याच्याशी आपला काय संबंध? किंवा ती काही फार मोठी गोष्ट नाही असं वाटतं. हा प्रकार आपल्याला त्रासदायक नाही अशा पद्धतीने तो गांभीर्याने घेतला जात नाही. प्रसंगी उडवून देखील लावला जातो. पण आता ग्लोबल वॉर्मिंगचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. जागतिक हवामान संस्थेने यासंदर्भातला गंभीर इशारा दिला आहे. ‘२०१९ हे वर्ष २०१६नंतरचं इतिहासातलं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलं आहे. २०२० हे वर्ष जास्त चटके देणारं असेल आणि पुढचं दशक म्हणजेच २०२० ते २०३० हे सर्वाधिक उष्ण दशक असेल’, असे ३ इशारे डब्ल्यूएमओने दिले आहेत. त्यामुळे प्रदूषणाला हातभार लावणाऱ्या प्रत्येकालाच याची झळ आता बसणार आहे. आणि या प्रत्येकाला यावर उपाय करून त्याला हातभार लावावा लागणार आहे.

पुढचं दशक आत्तापर्यंतचं सर्वाधिक उष्ण!

२०२० या वर्षात हवामान बदलाचा परिणाम म्हणून घडणाऱ्या अनेक घटना घडतील असा इशारा देखील डब्ल्यूएमओने दिला आहे. सुरुवातच ऑस्ट्रेलियाच्या जंगलामध्ये कित्येक दिवसांपासून धुमसत असलेल्या जंगलांपासून झाली आहे. १९८० सालापासून ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम दिसू लागले असून प्रत्येक दशक हे आधीच्या दशकापेक्षा अधिक उष्ण असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे, त्या वेगाने गेल्यास पुढच्या काही दशकांमध्ये पृथ्वीचं तापमान ३ ते ५ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, असं डब्ल्यूएमओकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. १८५० पासून जे तापमान फक्त १.१ अंशाने वाढल्यामुळे इतके परिणाम जाणवू लागले असताना ३ ते ५ अंशांनी वाढलेल्या तापमानात पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची काय अवस्था होईल, याचा विचार न केलेलाच बरा!

ग्रेटा थनबर्गची भिती योग्य होती!

संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक परिषदेमध्ये स्वीडनच्या ग्रेटा थनबर्ग या अवघ्या १६ वर्षांच्या मुलीने केलेलं भाषण अद्याप सगळ्यांच्या स्मरणात आहे. ‘पुढच्या पिढीसमोर आपण तापमानवाढीवर उपाय योजन्यासाठी काही करत आहोत, असं दाखवण्याची तुमची हिंमत कशी झाली?’ असा जळजळीत सवाल या मुलीने जगातल्या तमाम नेतेमंडळींना केला होता. त्यावेळी देखील जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी युद्धपातळीवर सगळ्यांनीच प्रयत्न करण्याची गरज तिने व्यक्त केली होती. त्यानंतर आता डब्ल्यूएमओने दिलेल्या या इशाऱ्यांमुळे ती गरज अधिक प्रकर्षाने अधोरेखित झाली आहे.


वाचा सविस्तर – ‘तुमची हिंमत कशी होते?’ १६ वर्षांच्या ग्रेटाने जागतिक नेत्यांना केला सवाल!