येडियुरप्पांनी भाजपच्या वरिष्ठांना हजारो कोटींची दिली लाच

Mumbai
काँग्रेसचे आरोप येडियुरप्पांनी फेटाळले

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते बी एस येडियुरप्पा यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना हजारो कोटींची लाच दिल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. विशेष म्हणजे ही डायरी आयकर विभागाच्या ताब्यात 2017 पासून असूनही पंतप्रधान मोदी यांनी त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले नसल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला आहे. मात्र, हे आरोप येडियुरप्पा यांनी फेटाळून लावले आहेत. आयकर विभागाने ती कागदपत्रे खोटी असल्याचे अगोदरच जाहीर केले असल्याचे येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, दिवसभरात दोनदा त्यांची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली. शेवटी रणदीप सुरजेवाला यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी दोन महत्त्वाचे केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकातील भाजपचे महत्त्वाचे नेते येडियुराप्पा यांच्यावर गंभीर आरोप केले. यासाठी त्यांनी सीबीआयकडील डायरीचा उल्लेख करत त्याच्या प्रती माध्यमांना दिल्या.

येडियुरप्पा यांना 2011 मध्ये खनिज घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात अटक झाली होती. यानंतर त्यांची 24 दिवसांनी सुटकाही झाली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणी सीबीआयने टाकलेल्या छाप्यांत 2017 मध्ये येडियुरप्पांची डायरी जप्त केली होती. या डायरीमध्ये केंद्रातील मोठ्या नेत्यांना तब्बल 1800 कोटी रुपये लाच दिल्याचा उल्लेख केला आहे.

सुरजेवाला यांनी या डायरीचे झेरॉक्स माध्यमांना दाखविले. या पानावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि राजनाथ सिंह यांच्या नावाचा उल्लेख आहे. या पानावर सीबीआयने येडियुरप्पांची सहीही घेतलेली आहे. यावरून सुरजेवाला यांनी भाजपाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले असून, येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना भाजपच्या मोठ्या नेत्यांना हजारो कोटी रुपयांची लाच देण्यात आल्याचा आरोप केला आहे. मात्र, सत्तेत येताच भाजपने आणि मोदी यांनी ही चौकशी थांबविल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेस निराश -येडियुरप्पा
यावर भाजपचे नेते बीएस येडियुरप्पा यांनी काँग्रेसचे आरोप बिनबुडाचे असून, ते मोदींच्या लोकप्रियतेमुळे निराश झाले आहेत. सुरू होण्याआधीच लढाई हरले आहेत. आयकर विभागाने ती कागदपत्रे खोटी असल्याची आधीच जाहीर केले असल्याचे सांगत आरोप फेटाळले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here