आशियातला सर्वात लांब भुयारी मार्ग ‘जोझिला पास’चं उद्घाटन

New Delhi
प्रातिनिधीक छायाचित्र

काश्मीरच्या खोऱ्यांना थेट लडाखपर्यंत जोडणाऱ्या ‘जोझिला पास’ या भुयारी मार्गाचं, शनिवार १९ मे रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. हा मार्ग एकूण १४.२ किलोमीटर लांबीचा असून तो आजवरचा आशियामधील सर्वाधिक लांबीचा भुयारी मार्ग असणार आहे. शनिवारी मोदींच्या हस्ते या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवण्यात येईल.

 

काश्मीर-लडाख येणार अजून जवळ !

काश्मीर खोऱ्यांतील सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आणि अतिबर्फवृष्टीमुळे अनेकदा लडाखशी असलेला त्यांचा संपर्क तुटतो. जोझिला पासमुळे ही समस्या दूर होणार आहे. या मार्गामुळे वर्षातील ३६५ दिवस कोणत्याही ऋतुमध्ये दळण-वळण व वाहतूक करणे सोपे होणार आहे. याशिवाय काश्मीर ते लडाख हे सुमारे ३ तासांचं अंतर केवळ १५ मिनीटांत कापता येणार आहे.

कारगिल युद्धानंतर खरी सुरुवात

काश्मीर सीमा सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही या भुयारी मार्गाला महत्त्व असणार आहे. साधारणत: २०२६ सालापर्यंत जोझिला पास पूर्णपणे बांधून तयार होईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे. जोझिला टनेल निर्मितीसाठीचा पहिला सर्वे भारतीय सेनेने १९९७ साली केला होता. मात्र, १९९९ च्या कारगिल युद्धानंतर या दिशेने ठोस पावलं उचलली गेली. जोझिला टनेलमुळे काश्मीर आणि लडाखमधील व्यावसायिक संबंध देखील दृढ होणार असल्याचे बोलले जात आहे. समुद्रसपाटीपासून अंदाजे ११ हजार ५७८ फूट उंचीवर हा टनेल बांधण्यात येणार आहे. जोझिला पासमुळे भारतीय लष्काराला सर्वाधिक फायदा होणार यात काही शंका नाही.

कसा असेल जोझिला टनेल? 

  • जोझिला टनेल हा १४.2 किलोमीटर लांबीचा आशियातील सर्वाधिक लांबीचा भुयारी मार्ग
  • वर्षाचे ३६५ दिवस कोणत्याही ऋतुमध्ये या टनेलद्वारे काश्मीर ते लडाख सहज प्रवास शक्य
  • हा टनेल सध्याच्या काश्मीर-लडाख महामार्गाच्या सुमारे ४०० मीटर खालून जाणार
  • भारतीय सैन्याच्या दृष्टीनेही हा भुयारी मार्ग अत्यंत सुरक्षित
  • विशेषत: अति बर्फवृष्टीच्या काळात भारतीय सैनिकांना या मार्गाने कारगिल पोस्टपर्यंत सुरक्षितपणे पोहोचणे शक्य
  • जोझिला पासमुळे काश्मीर ते लडाख मधील सुमारे ३ तासांचे अंतर, केवळ १५ मिनीटांत पार होणार
  • या टनेल मार्गावरुन वाहने ८० किलोमीटर प्रति तास वेगाने अंतर कापणार
  • बाहेरचे तापमान -४५ डिग्री इतके कमी असतानाही या मार्गावरुन सुरक्षित प्रवास करता यावा, याकरता खास उपाययोजना
  • या टनेल निर्मितीसाठी साधारणत: ६ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च
  • २०२६ सालापर्यंत बांधकाम होणार पूर्ण