संभाजीराजे अमोल कोल्हे यांना समशेरींची भेट

ऐतिहासिक व्यक्तिरेखा करणाऱ्या अमोल कोल्हे यांना अनेक कार्यक्रमात केलेल्या कार्याचा सन्मान करतांना समशेरींची भेट

mumbai

कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस साकारणाऱ्या मालिकांच्या यादीत ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचे नाव आवर्जून घेतले जाते. या मालिकेतील कलाकार मंडळींवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. या मालिकेतील संभाजी राजेंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता डॉ. अमोल कोल्हेंनी अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ऐतिहासिक व्यक्तिरेखा करणाऱ्या अमोल कोल्हे यांना अनेक कार्यक्रमात त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान करतांना तलवार भेट दिली जाते. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांना तब्बल १५० हून अधिक तलवारी भेट म्हणून मिळाल्या आहेत.

‘शंभूराजे’ या नाटकाचे ५०० पेक्षा अधिक प्रयोग अमोल कोल्हे यांनी केले होते. तसेच ‘शिवपुत्र संभाजी राजे’ या महानाट्याचे १२५ प्रयोग देखील सुरूवातीच्या काळात त्यांनी केले होते. याआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून अमोल कोल्हे यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. सध्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या निमित्तानं अमोल कोल्हे पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.

मालिकेतील संभाजी साकारतांना…

‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेतील अमोल कोल्हे यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका ही अजरामर ठरली आहे. समाजमाध्यमांवर आजही प्रेक्षकांकडून ‘राजा शिवछत्रपती’ही मालिका आवर्जून बघितली जाते. ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेनंतर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत काम करत असतांना संभाजी राजेंची भूमिका साकारण्यासाठी शारीरिक, बौद्धिक व मानसिक विशेष तयारी करावी लागली. शारीरिक मेहनत घेत असतांना भारदस्त छाती, धिप्पाड शरीरयष्टी मिळवण्यासाठी अधिक काळ मेहनत घ्यावी लागली. बौद्धिक पातळीचा विचार करता संभाजी महाराजांवरील अनेक पुस्तकांचे आणि महाराजांवरील प्रबंधांचे वाचन केले. यांतील प्रत्येक लिखाण हे त्यांचा महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोनातून असल्याने त्या दृष्टिकोनाचा अभ्यास केला.

इतिहासातील एक सुवर्णकाळ दाखविणारी मालिका असल्याने इतिहासाला कुठेही गालबोट न लागता मालिका प्रेक्षकांसमोर सादर करत भावी तरूण पिढीला संभाजींच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्यासाठी सदर मालिका स्वीकारली. तसेच हिंदुस्थानातील इतिहासातला एकमेव ‘अँग्री यंग मॅन’म्हणजे राजे संभाजी. संभाजी महाराज जर आणखी काही काळ असते, तर संपूर्ण हिंदुस्थानचा इतिहास त्यांनी बदलला असता. त्यांचाच इतिहास मी तरुणांना सांगण्यासाठी ही मालिका करतोय. असे अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here