घरमनोरंजनअभिनयाचा शिलेदार अजय पूरकर

अभिनयाचा शिलेदार अजय पूरकर

Subscribe

अजय पूरकर हा फक्त अभिनेता म्हणूनच परिचयाचा नाही तर गायकीच्या क्षेत्रातही त्याने योगदान दिलेले आहे. त्यामुळे गायक नट म्हणूनही त्याची ओळख आहे. छान अशी शरीरयष्टी त्याला लाभलेली आहे. त्याचा वापर तो देहबोलीसाठी करतो. त्यामुळे त्याने स्वीकारलेली प्रत्येक भूमिका ही लक्षवेधी ठरलेली आहे. डिसेंबर महिना हा त्याच्यासाठी खास म्हणावा लागेल.त्याचे कारण म्हणजे मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात त्याचा प्रभाव दिसणार आहे. ‘ऑपरेशन जटायू’ या नाटकाचा शुभारंभ याच महिन्यात होणार आहे. ‘स्पेशल 5’ ही मालिका स्टार प्रवाहवर सुरू झालेली आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘भाई व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट प्रमोशनासाठी सज्ज झालेला आहे. या निमित्ताने भेदक डोळे, खणखणीत आवाज, भारदस्त व्यक्तिमत्त्व असणार्‍या अजयशी साधलेला सुसंवाद.

‘ऑपरेशन जटायू’ काय आहे?
‘ऑपरेशन जटायू’ दिग्पाल लांजेकर आणि नितीन वाघ यांनी लिहिलेल्या नाटकाचे शिर्षक आहे. दिग्पालने या नाटकाचे दिग्दर्शन केलेले आहे. दिनू पेडणेकर निर्मिती ‘कोडमंत्र’ या नाटकात कर्नल प्रताप निंबाळकर यांची व्यक्तीरेखा मी साकार केली होती. प्रेक्षकांनी या नाटकाचे कौतुक केलेच परंतु माझ्याही भूमिकेची दखल घेतली होती. करारी व्यक्तीमत्त्वाची भूमिका मी छान साकारतो हे यातून सुचित झाले. दिग्पालने ‘ऑपरेशन जटायू’ हे नाटक लिहायला घेतले त्यावेळी यातील मध्यवर्ती भूमिकेसाठी त्याने पूर्वीच विचार केला होता. पुरूष प्रधान हे नाटक आहे. यात स्त्री-कलावती नाही. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे सैन्य दलातील ज्या चार-पाच जबाबदार्‍या सांभाळणारे कर्नल असतात, त्यांची ही कथा आहे. चूक केली म्हणून शिक्षा देणे जसे क्रमप्राप्त आहे तसे त्यातून सुटका करण्यासाठी जे पुरावे सादर केले जातात, त्याचा न्यायनिवाडा करणारे हे नाटक आहे. ‘कोडमंत्र’ मध्ये मी जसा दिसलो त्याच्या विरूद्ध ‘ऑपरेशन जटायू’ मधील माझी भूमिका आहे. प्रेक्षकांना ती आवडेल असा मला विश्वास वाटतो.

- Advertisement -

हे नाटक स्वीकारण्याचे कारण काय?
या नाटकात क्रांती सुर्वेची भूमिका मी निभावणार आहे. लेखक दिग्पालने या भूमिकेसाठी माझा आग्रह धरलेला असला तरी माझे स्वत:चे असे निरीक्षण आहे. दिग्पालचे लेखनाइतकेच दिग्दर्शनही अभ्यासपूर्ण असतं. व्यक्तीचे अचूक निरीक्षण त्याच्या लिखानात पहायला मिळते. त्यासाठी संवादाचे जे सामर्थ्य असावे लागते, ते त्याच्या लिखाणात आहे. त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सहकलाकारांचाही तेवढ्याच प्रकर्षाने विचार करताना दिसतो. कलाकार प्रेक्षकांच्या नजरेत भरतो, त्याला कारण त्याचे लेखन-दिग्दर्शन सांगता येईल. ज्या ज्या कलाकृतीला त्याने स्पर्श केलेला आहे, ती संस्मरणीय ठरलेली आहे. ‘ऑपरेशन जटायू’ स्वीकारण्याचे हे मुख्य कारण आहे.

‘स्पेशल-5’ या मालिकेबद्दल काय सांगशील?
ही स्टार-प्रवाहवर दाखवली जाणारी पोलीस चातुर्यावर आधारित कथा आहे. सर्वच वाहिन्यांवर गुन्हेगारी मालिका दाखवल्या जातात. क्राईम पेट्रोल ही मालिका सोडली तर अशा गुन्हेगारी मालिकेत प्रेक्षकांनी दखल घ्यावी असे फारसे काही घडत नाही. ‘स्पेशल-5’ चा गाभा हा गुन्हेगारी असला तरी यात पोलिसांच्या प्रत्यक्ष जीवनातील, त्यांच्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या बारकाव्यांनाही महत्त्व दिलेले आहे. पात्रांची पोलीस कार्यपद्धती दाखवताना समाजव्यवस्था, कौटुंबीक संघर्ष याचेही दर्शन घडवलेले आहे. काही वेगळे सांगणारी ही मालिका असल्यामुळे इन्स्पेक्टर यशवंत ही व्यक्तीरेखा साकार करण्याची मी तयारी दाखवली. प्रेक्षकांकडून याही भूमिकेचे कौतुक होत आहे.

- Advertisement -

‘भाई व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट तुझ्यासाठी खास असेल ना?
याचे उत्तर हो असेच असणार. त्याचे कारण म्हणजे पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे जो महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला आहे. एका वेगळ्या भूमिकेसाठी त्याने माझ्याशी संपर्क साधला होता, पण देवीदास ठाकूर या चित्रपटाच्या चित्रिकरणात गुंतल्यामुळे भाई चित्रपटासाठी वेळ देणे शक्य नव्हते. तरीपण एखाद दुसरी भूमिका करावी असा महेशचा आग्रह होता. मी तो पूर्ण करू शकलो याचा मला आनंद होत आहे. साठ-सत्तर कलाकारांचा ताफा या चित्रपटात आहे. त्यांच्या भूमिकेबरोबर माझ्याही भूमिकेची प्रशंसा होणार आहे. चित्रपटाचे प्रमोशन या महिन्यात होत आहे. नव्या वर्षाच्या सुरवातीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मालिका-चित्रपट-नाटक तिहेरी योगाबद्दल काय सांगशील?
माझ्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. मुळशी पॅटर्न, फर्जंद, मुंबई टाईम ठळक म्हणावेत अशा अनेक चित्रपटांमध्ये मी काम केलेले आहे. मालिका-चित्रपटात काम करणे हे सुरूच राहणार आहे, पण नाटकात काम करण्याचा जो आनंद आहे तो अन्य माध्यमांत नाही. नाटक ही जिवंत कला आहे. त्या रंगमंचावर मला स्वत:ला तपासता येतं. चांगलं काम करून प्रतिक्रिया मिळवता येतात. अभिनयाबरोबर गायकीलासुद्धा जपता येते. त्यामुळे माझ्या व्यक्तीमत्त्वाला साजेल असे नाटक आले तर सर्वच अडचणींवर मात करून प्रयोग करण्याची माझी तयारी असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -