भावेंची कन्या ‘पूर्वी’ आणि आता

कुशल निवेदिका म्हणून पूर्वी भावेची सांस्कृतिक क्षेत्रात ओळख आहे. याचा अर्थ तिने अन्य माध्यमात आपला प्रभाव दाखवला नाही असे नाही. ‘माझी आई तिचा बाप’, ‘आषाढ बार’ या नाटकात ‘दोन किनारी दोघी’ या मालिकेत ती दिसली होती. ‘स्कूल, कॉलेज आणि लाईफ’ या आगामी मराठी चित्रपटात ती दिसणार आहे. ‘त्या सांज किनार्‍यापाशी’ या अल्बमची ती नायिका होती. यासाठी लिहिले गेलेले गीत हे तिनेच लिहिले होते. भरतनाट्यम् शैलीत अनेक ठिकाणी तिने नृत्याचे कार्यक्रम केलेले आहेत. अभिनेत्री, नर्तिका, निवेदिका, कवयित्री असा तिचा वीस वर्षांहून अधिक प्रवास आहे. आपल्यामध्ये एक देखणे रुप दडलेले आहे, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावे यादृष्टीने जे तिने प्रयत्न केले ते तिच्या चाहत्यांना आवडले. त्यामुळे भावेंची कन्या पूर्वी आणि आता असे तिच्याकडे तुलनात्मक बघणे वाढलेले आहे. हे निमित्त घेऊन तिच्याशी साधलेला सुसंवाद.

Mumbai
Poorvi Bhave

अचानक लक्षवेधी फोटोसेशन करण्याची गरज का वाटली?
मी मुळात अभिनेत्री असल्यामुळे माध्यमाची गरज म्हणून मी यापूर्वीही फोटोसेशन केलेले आहे. अर्थात ते मी स्वत:च्या आनंदासाठी. आता सोशल मीडियावर असे फोटो टाकल्यामुळे आपल्याबद्दलचे लोकांमध्ये जे काही गैरसमज आहेत ते दूर होण्यास मदत होते. शिवाय आपल्या व्यक्तिमत्त्वाविषयी असलेल्या प्रतिक्रिया लागलीच कळायला लागतात. निवेदिका म्हणून माझी लोकांमध्ये असलेली प्रतिमाही मला ज्ञात होती. परंतु निवेदिकेच्यामागे माझे स्वत:चे एक व्यक्तिमत्त्व आहे ज्यात वल्गरपणा न आणता स्त्रीचे देखणेपण कसे असू शकते हे फोटोसेशनच्या माध्यमातून मी पाहण्याचा प्रयत्न केला. कपड्यांची रंगसंगती, केली जाणारी रंगभूषा ही स्त्रीचे व्यक्तिमत्त्व खुलवते हे या फोटोसेशनमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. निमित्त मी असले तरी ही किमया भरत पवार यांनी केलेली आहे. यापूर्वी तेजस नेरुरकर यांनीसुद्धा छायाचित्रे टिपली होती की ज्यात फोटोग्राफरचे वैशिष्ठ्य प्रकर्षाने अधिक जाणवते. अलिकडे बर्‍याचशा अभिनेत्री अशा लक्षवेधी फोटोसेशन करत असतात. त्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही.

घरच्यांची काय प्रतिक्रिया?
माझी आई वर्षा भावे ही गायिका, संगीतकार म्हणून परिचयाची असली तरी ती मूळची संगीत रंगभूमीची अभिनेत्री आहे. आमचं संपूर्ण कुटुंब हे संगीत नाटकाशी संबंधित आहे. त्यांच्याच प्रेरणेने मी या कलेच्या प्रांतात आले. या क्षेत्रात आले म्हणजे स्वत:चे नियम लावून काम करता येत नाही. थोडासा भीडस्तपणा हा आवश्यक असतो, हे घरच्यांना माहीत आहे. त्यामुळे लक्षवेधी फोटोसेशन करताना माझ्याबरोबर त्यांनासुद्धा त्याबद्दल चर्चा करावी किंवा संमत्ती घ्यावी असे वेगळेपण वाटत नाही. कुटुंबाबरोबर माझ्या मित्र-मैत्रिणींनीही माझ्या या निर्णयाचे कौतुक केलेले आहे. नव्या वर्षात माझ्या वैयक्तिक जीवनात मी जे दोन-चार निर्णय घेतले त्यापैकी हा एक निर्णय आहे. जे वाटते ते कृतीतून व्यक्त झाले पाहिजे. शास्त्रीय नृत्यात अनेक वर्षे योगदान दिल्यानंतर मी माझ्यातल्या शिक्षिकेला आता प्राधान्य दिलेले आहे. ‘हाऊस ऑफ द नृत्य’ ही माझी नृत्याचे प्रशिक्षण देणारी संस्था स्थापन केलेली आहे. अनेक पालक, नृत्य शिकणारी मुलं-मुली या संस्थेला जोडले गेलेले आहेत. पालक हे सुजाण असल्यामुळे नृत्यशिक्षिका आणि अभिनेत्री या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे त्यांना सांगावे लागत नाही.

भरतनाट्यम् स्वीकारण्याचे कारण काय?
सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे घरात संगीत नाटकाचे वातावरण होते. त्यानिमित्ताने संगीत, गायन या कला आईच्या निमित्ताने जपल्या जात आहेत. मी लहान असताना मला जेव्हा विचारणा झाली, कोणती कला शिकायला आवडेल गाणं की शास्त्रीय नृत्य? हे दोन पर्याय माझ्यासमोर ठेवले. त्यातून मी शास्त्रीय नृत्य शिकण्याची तयारी दाखवली. माझ्या आईची स्वत:ची ‘कलांगण’ नावाची संस्था आहे. त्यानिमित्ताने शास्त्रीय नृत्याचे अनेक कार्यक्रम मला जवळून पहाता आले होते. मी कथ्थक थोडेफार शिकले असले तरी मला भरतनाट्यम्ची अधिक आवड आहे. त्यापाठीमागे मोहक हालचाली, अभिनय या दोहोंचा मिलाप या नृत्यप्रकारात पहायला मिळतो. कलाकाराचे कसब यात दिसायला लागते म्हणण्यापेक्षा ते दाखवण्याची क्षमता नृत्यांगणेमध्ये असावी लागते. डॉ. संध्या पुरेचा यांच्या सरफोजीराजे भोसले सेंटरमध्ये मी भरतनाट्यम् नृत्यशैलीत पदवी संपादन केलेली आहे. या शिक्षणासाठी दिल्ली सांस्कृतिक विभागाची शिष्यवृत्तीही मला प्राप्त झाली होती.

नाटकात फारशी रमली नाहीस?
खरं सांगायचं तर आपण सर्वच क्षेत्रात दिसायला हवे ही माझी पूर्वीपासूनची इच्छा होती. पण पदार्पणाच्या काळातच निवेदनाच्या काही जबाबदार्‍या माझ्यावर सोपवल्या गेल्या. त्यातून निवेदिकेने एक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी काळजी घ्यावी लागते, ती मी इथे घेतली होती. आवाज, पेहेराव, कार्यक्रमाचे संदर्भ, निरीक्षणे माझ्या निवेदनात दिसायला लागली. उत्स्फूर्त बोलणे अनेकांना भावले आणि यातून निवेदनाची अनेक कामे माझ्याकडे आली. एखादे काम घेतल्यानंतर दुसरे काम घेता येत नाही. दिलेला शब्द पाळता आला पाहिजे ही शिकवण माझ्या घरातूनच होती. या दरम्यान अनेक नाटके, चित्रपट आले होते, ते मला स्वीकारता आले नाही. ‘आषाढ बार’ हे नाटक करण्याला कारण म्हणजे ते प्रायोगिक होते. दुसरं म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी हे या नाटकाचे दिग्दर्शक होते. या प्रयोगाच्या निमित्ताने रंगमंचावरील वावर कसा असतो हे मला कळाले.

मग मालिकेचे काय?
मी फक्त एकाच मालिकेत काम केले. नंतर मात्र मला मालिकेत काम करण्याची इच्छा झाली नाही. आपली स्वत:ची प्रतिमा असताना कोणा दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून अभिनय करणे, आपल्या जीवनशैलीची दिशा ठरवणे, थोडक्यात आपल्याला जे येतं त्याला नाकारुन दुसर्‍या गोष्टीला स्वीकारणे मला स्वत:ला मान्य नव्हते. ‘घे भरारी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर मी दिसेन असे पाहिले होते. पण आता मात्र माझी आवडत्या क्षेत्रातील करिअरची हौस संपल्यानंतर नाटक, चित्रपट, मालिका यासाठी वेळ देण्याची मी तयारी दाखवलेली आहे. मध्यंतरी एका हिंदी प्रायोगिक नाटकात काम केल्यानंतर नृत्य, निवेदन याहीपलीकडे अन्य क्षेत्रातही मी दिसावी अशा चाहत्यांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. आता पाहुया पुढे काय होतं ते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here