घरमनोरंजनसयामी खैरची पंढरपूरवारी; शिकली ग्रामीण मराठी

सयामी खैरची पंढरपूरवारी; शिकली ग्रामीण मराठी

Subscribe

मराठी चित्रपटात काम केल्याचा आपल्याला आनंद आणि समाधान असल्याचं सयामी सांगते. 'माऊली' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला सयामीचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळतो.

अभिनेता रितेश देशमुखचा ‘माऊली’ चित्रपट येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. हिंदीतील अभिनेत्री सयामी खैर ‘माऊली’च्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करते आहे. दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मर्ज़ियाँ’ या हिंदी चित्रपटातून सयामी खैरने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. आजवर आपल्या हॉट अँड ब्युटिफूल लूकने सर्वांना घायाळ करणारी सयामी, माऊली चित्रपटांत मात्र मराठमोळ्या ग्रामीण अवतारात दिसत आहे. दरम्यान, माऊलीच्या निमित्ताने नुकताच सयामी खैरला पंढरपूर आणि जेजूरीला जाण्याचा योग आला. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सयामीने संपूर्ण टीमसह जेजुरीच्या खंडोबाचं आणि पंढरपुरच्या विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतलं. याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘माऊली‘मध्ये मध्यवर्ती भूमिका साकारणारे जितेंद्र जोशी आणि सिद्धार्थ जाधव हे दोन अभिनेतेही सयामीसोबत पंढरपूर आणि जेजुरीला गेले होते. दरम्यान, मराठी चित्रपटात काम केल्याचा आपल्याला आनंद आणि समाधान असल्याचं सयामी सांगते. ‘माऊली’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला सयामीचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळतो.

 

- Advertisement -

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

- Advertisement -

ग्रामीण भाषेचे गिरवले धडे

मूळची हिंदी भाषिक असलेल्या सयामी खैरला ‘माऊली’साठी मराठी भाषा शिकणं गरजेचं होतं. त्यातही चित्रपटाची कथा ग्रामीण भागातील असल्यामुळे, सयामीला ग्रामीण मराठी शिकणं क्रमप्राप्त होतं. सूत्रांनुसार, सयामीने अभिनेता सिद्धार्थ जाधव याच्याकडून खास ग्रामीण मराठीचे धडे घेतले. माऊली चित्रपटासाठी अपेक्षित असलेला भाषेतील ग्रामीण लहेजा सिद्धार्थने सयामीला शिकवल्याचं समजतंय. उपलब्ध माहितीनुसार, सयामी आणि सिद्धार्थ यांना खेळाची आणि भाषा शिकण्याची आवड आहे. आवडीतील याच साधर्म्यामुळे सयामी आणि सिद्धार्थची सेटवर लवकरच गट्टी जमली. त्यानंतर शूटिंग करतेवेळी जेव्हा जेव्हा सयामी मराठीत बोलताना अडखळायची, तेव्हा सिद्धार्थ जाधव तिच्या मदतीला उभा राहायचा. ग्रामीण मराठीतले उच्चार, त्यातील गमती-जमती याचं सिद्धार्थ सयामीला ट्रेनिंग द्यायचा आणि सयामी लगेचच सीनमध्ये त्याची अंमलबजावणी करायची. सिद्धार्थ-सायमीची ही मेहनत ‘माऊली’च्या ट्रेलरमध्ये दिसून येते.

‘माऊलीचा थाट लय भारी’

माऊली चित्रपटात रितेश देशमुख लई भारी चित्रपटातल्या माऊलीचं पात्र साकारत आहे. मात्र, असं असलं तरी नवा ‘माऊली’ हा लई भारी चित्रपटाचा सिक्वल किंवा प्रिक्वल नाही. ‘माऊली’ हे नाव आणि पात्र वगळता या दोन्ही चित्रपटांचा काहीच संबंध नाही. माऊली चित्रपट हा लई भारीची फ्रेन्चाइजी असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट १४ डिसेंबर २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आदित्य सरपोतदार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून जिनेलिया डिसूजा यांनी माऊलीची निर्मिती केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -